चोरीतील १० लाख महिलेला दिल्याचे समोर

पणजी : कोलवाळ पोलीस स्थानकाच्या हद्दीतील थिवी येथील एका फ्लॅटमधून १.८५ कोटी रुपये चोरी करण्यात आले होते. या प्रकरणी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने तस्बीह रफीक बारोदली या महिलेला २५ हजार रुपये व इतर अटींवर सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. याबाबतचा आदेश न्या. आशिष चव्हाण यांनी दिला.
या प्रकरणी लोबोवाडो, थिवी येथील चंद्रकांत गाड यांनी १ डिसेंबर २०२५ रोजी कोलवाळ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, तक्रारदाराच्या घरात १.८५ कोटी रुपये ठेवले होते. घरात कोणी नसल्याची संधी पाहून संशयित कबीर महावीर प्रधान यांनी चोरी केल्याचे तक्रारीत म्हटले होते. याची दखल घेऊन कोलवाळ पोलीस निरीक्षक संजीत कांदोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रकाश घाडी यांनी गुन्हा दाखल करून कबीर महावीर प्रधान (रा. बागा-कळंगुट व मूळ झारखंड) या संशयिताला अटक केली. त्याची अधिक चौकशी केली असता, संशयिताने कमलेश सथालिया उर्फ जस्टीन (रा. गिरी बार्देश व मूळ गुजरात) याच्या मदतीने चोरी केल्याचा जबाब दिला. त्यानुसार, पोलिसांनी संशयित कमलेशला अटक केली.
दरम्यान चोरीतील १० लाख रुपये संशयितांनी तस्बीह रफीक बारोदली हिला दिल्याचे समोर आले. त्यानुसार, पोलिसांनी तिला चौकशीसाठी पाचारण केले. याच दरम्यान बारोदली हिने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. त्यानंतर गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात तस्बीह बारोदली हिने अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी झाली असता, संशयितांनी तिच्याकडे भूखंड खरेदी करण्यासाठी १० लाख रुपये दिल्याची माहिती याचिकादाराच्या वकिलाने दिली. दरम्यान, सरकारी वकिलाने पोलिसांची बाजू मांडताना बारादोली हिने पत्र लिहून सदर रक्कम परत करण्यास तयार असल्याची माहिती दिली होती. नंतर तिने शब्द पाळला नाही. तसेच सदर रक्कम परत करण्यास नकार दिल्याचे न्यायालयात माहिती दिली. या प्रकरणी न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाजू एेकून घेतल्यानंतर तस्बीह रफीक बारोदली हिला २५ हजार रुपये व इतर अटीवर सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला.
महिलेचा चोरीशी संबंध
चोरीतील १० लाख रुपये तस्बीह बारोदलीला दिल्याचे उघड.
बारोदलीची पोलिसांकडून चौकशी
सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला