
पणजी : गुडी, पारोडा येथे एका खडी क्रशर कामगाराचा १० महिन्यांच्या मुलाचा बादलीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला. विराज वडार असे मृत मुलाचे नाव असून त्याचे पालक मूळ कर्नाटकातील आहेत.
ही घटना शनिवार, दि. १८ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. मुलाची आई स्वच्छतागृहात गेली होती. तिने पाणी भरलेली बादली स्वच्छतागृहाच्या दरवाजा बाहेर ठेवली होती. तर मुलगा बाहेर खेळत होता. खेळता खेळता तो बादलीच्या आतमध्ये गेला आणि तिथेच पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.
बाळाची आई स्वच्छतागृहातून बाहेर आल्यावर हा प्रकार तिच्या नजरेस पडला. केपे पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी मडगाव जिल्हा इस्पितळात दाखल केला आहे.
पोलिसांनी अपघाती मृत्यू म्हणून प्रकरण नोंदवलेले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रशल नाईक देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लिशा देयकर या करत आहेत.