आश्वे मांद्रेत कॉटेजना आग लागून कोट्यवधींच्या मालमत्तेचे नुकसान

आगीचे कारण अस्पष्ट : सीआरझेडचे उल्लंघन करून थाटला होता व्यवसाय

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16th April, 11:06 pm
आश्वे मांद्रेत कॉटेजना आग लागून कोट्यवधींच्या मालमत्तेचे नुकसान

पेडणे : आश्वे-मांद्रे येथील श्री देव आजोबा मंदिराशेजारी असलेल्या 'दलाल बीच रिसॉर्ट'मधील आलिशान कॉटेजेसना गुरुवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत ६ ते ७ कॉटेजेस जळून खाक झाले असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने, आगीच्या वेळी कॉटेजेसमध्ये कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली.

हे कॉटेजेस सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून, कोणत्याही सरकारी परवानगीविना उभारण्यात आले होते. याप्रकारणी स्थानिक नागरिकांनी तक्रार केल्यानंतर, तत्कालीन सरपंच अ‍ॅड. अमित सावंत यांनी संबंधितांना कायदेशीर नोटीस बजावून बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. मात्र, संबंधितांनी पंचायत संचालनालयाकडून या आदेशाला स्थगिती मिळवली होती.

विद्यमान सरपंच किरण सावंत यांनी सांगितले की, हे कॉटेजेस बेकायदेशीर असून पंचायतीने त्यांना कोणताही परवाना दिला नव्हता. बेकायदेशीररीत्या सुरू असलेले येथील रेस्टॉरंट व इतर सुविधांमुळे हा परिसर सील करण्याची प्रक्रिया सुरू होती, मात्र त्यापूर्वीच ही आगीची घटना घडली.

देवस्थान समितीचा विरोध

ज्या जागेत हे रिसॉर्ट उभारले होते, ती जागा श्री देव आजोबा मंदिराच्या शेजारी आहे. या बांधकामाला देवस्थान समिती आणि स्थानिक पंचायतीचा तीव्र विरोध होता. एका बैठकीत संबंधित व्यावसायिकाने कॉटेजेस हटवून ती जागा देवस्थानला देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु त्याची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती.

आगीच्या वेळी काही पर्यटक बाहेर फिरायला गेले होते. त्यांचे मौल्यवान सामान कॉटेजेसमध्येच अडकले होते. स्थानिकांनी प्रसंगावधान राखून कॉटेजेसची कुलुपे तोडली आणि पर्यटकांचे सामान सुरक्षित बाहेर काढले.

अग्निशामन दलाला उशीर

आग लागल्यानंतर स्थानिकांनी ती विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले, परंतु बंब घटनास्थळी उशिरा पोहोचल्याने तोपर्यंत ७ कॉटेजेस भस्मसात झाले होते. पेडणे आणि म्हापसा येथील अग्निशामन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

हेही वाचा