‘३२ एन्ड अव्हेन्यू ग्रुप’च्या मालमत्तांवर ‘ईडी’चा छापा

गोव्यासह ७ ठिकाणांचा समावेश : अडीच कोटीपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16th April, 11:04 pm
‘३२ एन्ड अव्हेन्यू ग्रुप’च्या मालमत्तांवर ‘ईडी’चा छापा

म्हापसा : मनी लाँड्रिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ३२ एन्ड अव्हेन्यू ग्रुप आणि या ग्रुपचे प्रवर्तक- संचालक अनुभव शर्मा, ध्रुव शर्मा व इतरांशी संबंधित सुरू असलेल्या तपासाच्या अनुषंगाने गोव्यासह दिल्ली (एनसीआर), जयपूर आणि मुंबईतील सात ठिकाणांवर छापा टाकला. छाप्यात अडीच कोटींपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

छाप्यावेळी १.०५ कोटी रुपये रोख रक्कम, १.५ कोटी रुपयांचे सोन्याचे बार आणि दागिने तसेच मालमतेशी संबंधित विविध दस्तावेज, डिजिटल उपकरणे आणि अन्य साहित्याचा समावेश आहे. शिवाय काही बँक खाती गोठवण्यात आली आहेत.

या गुन्ह्यांचा तपास ईडीने सुरू केला आहे. १३ व १४ एप्रिल रोजी ईडीच्या मुख्यालयातर्फे गोव्यासह इतर राज्यांतील ७ ठिकाणी छापेमारी करण्यात आली.

गुंतवणूकदारांना आमिष दाखवणे, मालमत्तेचा ताबा न देणे, निधीचे वळतीकरण आणि अपहार करणे, बनावट व खोटे दस्तावेज तयार करणे आणि वापरणे, वैधानिक देणी न चुकवणे आणि अनेक संस्थांच्या माध्यमातून निधीचे मनी लाँड्रिंग करणे, यासारख्या संघटीत आणि गुन्हेगारी कारवायांमध्ये संशयितांचा समावेश आहे. या गुन्हेगारीतून संशयितांनी मोठ्या प्रमाणात मालमत्ता निर्माण केली आहे.

आरोपींनी गुंतवणूकदारांचा निधी वळवून केलेल्या बेकायदेशीर कारवायांतून ५०० कोटी रुपयांहून जास्त पैसा मिळवला होता. त्यानंतर हा निधी अनेक शेल किंवा बेनामी संस्थांच्या विविध खात्यांमधून फिरवून लपवण्यात आला. आरोपींनी अनेक गुंतवणूकदारांना व्हर्च्युअल स्पेस (आभासी जागा) विकल्या. त्यानंतर त्या जागा पुन्हा भाडेतत्त्वावर घेतल्या आणि काही महिन्यांसाठी त्यावर आकर्षक भाडे-परतावा दिला.

प्रकल्पाच्या आराखड्याच्या नकाशांमध्ये त्याच व्हर्च्युअल स्पेसमध्ये फेरफार करण्यात आले आणि त्या जागा पुन्हा इतर गुंतवणूकदारांना विकल्या गेल्या. अशा प्रकारे जनतेची फसवणूक करून बेकायदेशीर व्हर्च्युअल कमर्शियल स्पेसच्या आडून एक फसवणुकीची पॉन्झी योजना चालवली जात होती.

संशयित संचालक आणि प्रवर्तक हे गुंतवणूकदारांकडून जमा केलेला पैसा स्वत:चे ऐषारामी जीवन जगण्यासाठी वापरत होते. गुरुग्राममधील आलिशान अपार्टमेंट्समधील निवासस्थाने आणि गोव्यातील याट (लक्झरी बोट) यांसारख्या गोष्टींचा यात समावेश होता, असे ईडीच्या चौकशीतून निष्पन्न झाले आहे.

दरम्यान, गोवा, गुरुग्राम आणि महाराष्ट्र येथे स्थित जमीन, इमारती इत्यादींच्या स्वरूपातील अनेक स्थावर मालमत्ता ईडीने शोधून काढल्या आहेत. या गुन्हेगारी कारवायांच्या माध्यमातून मिळवल्या गेल्या असाव्यात असे आढळून आले.

ध्रुव शर्मा, शिरीन शर्मा यांना अटक

मनी लाँड्रिंग प्रकरणी दिल्ली आणि गुरुग्राम पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. हरियाणा पोलिसांनी ध्रुव शर्मा व शिरीन शर्मा यांना अटक केली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर, अनुभव शर्मा व ममता शर्मा हे फरार आहेत. 

हेही वाचा