अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यासह दोघांना अटक; फोंडा पोलिसांची कारवाई

फोंडा : बोरी येथे रविवारी रात्री एका दुकानदाराला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये अमोघ नाईक (बोरी) आणि विशांत गावडे (आगापूर) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, विशांत गावडे हा फोंडा अग्निशमन दलाचा कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री अमोघ नाईक रस्त्यावरून जात असताना त्यांचा एका दुकान मालकाशी वाद झाला. या वादाचे रूपांतर शाब्दिक चकमकीत आणि त्यानंतर मारहाणीत झाले. अमोघ नाईक आणि त्याच्यासोबत असलेल्या विशांत गावडे व अन्य दोघांनी मिळून दुकानदाराला बेदम मारहाण केली.
संशयितांनी केवळ मारहाणच केली नाही, तर दुकानदाराकडे पैशांची मागणी करून त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकारामुळे प्रचंड घाबरलेल्या दुकानदाराने रविवारी रात्री उशिरा फोंडा पोलीस स्थानक गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी तत्परतेने गुन्हा दाखल करून अमोघ नाईक आणि विशांत गावडे यांना बेड्या ठोकल्या.
संशयित अमोघ नाईक याच्यावर यापूर्वीही विविध पोलीस स्थानकांमध्ये गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. फोंडा अग्निशमन दलात कार्यरत असलेला विशांत गावडे या गुन्ह्यात अडकल्याने त्याच्या अडचणीत वाढ झाली असून, सरकारी सेवेत असल्याने त्याच्यावर विभागीय कारवाईची टांगती तलवार आहे.
अन्य दोन संशयितांचा शोध सुरू
या प्रकरणात सहभागी असलेल्या अन्य दोन संशयितांचा शोध पोलीस घेत आहेत. फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक मोहन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रज्योत बखले या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.