
वॉशिंग्टन/तेहरान: इराण आणि अमेरिकेमधील (Iran-USA) तणाव कमी होण्याची चिन्हे दिसत असतानाच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (Donald Trump) यांनी पुन्हा कठोर भूमिका घेतली आहे. युद्धविरामाची मुदत संपल्यानंतर कोणताही ठोस करार झाला नाही, तर पुन्हा हल्ले सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
अमेरिकेची इराणवरील नाकेबंदी कायम
दरम्यान, इराणने महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीतून (Strait of Hormuz ) व्यापारी जहाजांची वाहतूक पूर्णपणे सुरू झाल्याची घोषणा केली. मात्र, ट्रम्प यांनी इराणवरील अमेरिकन नाकेबंदी कायम ठेवण्याचा निर्णय स्पष्ट केला. इराणने अणुकार्यक्रमासह विविध मुद्द्यांवर करार केल्याशिवाय ती हटवली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.
इराणचा अमेरिकेच्या भूमिकेवर आक्षेप
इराणच्या संसदाध्यक्ष मोहम्मद बागेर कालिबफ यांनी अमेरिकेच्या या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेत, ही कारवाई युद्धविरामाचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. नाकेबंदी कायम राहिल्यास होर्मूझ सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
तेलाच्या किमतीत ९ टक्क्यांनी घसरण
दरम्यान, या घडामोडींमुळे जागतिक बाजारपेठेत चढ-उतार दिसून आले. होर्मूझ मार्ग खुला झाल्याच्या बातमीमुळे तेलाच्या किमतीत सुमारे ९ टक्क्यांची घसरण झाली, तर अमेरिकन शेअर बाजारात मोठी उसळी दिसली. विश्लेषकांनी मात्र परिस्थिती पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी विश्लेषकांनी मात्र परिस्थिती पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी काही महिने लागू शकतात, असा इशारा दिला आहे.
हिझबुल्लाविरोधातील कारवाई संपलेली नाही : इस्त्रायल
याच वेळी इस्त्रायल (Israel) आणि लेबनॉन (Lebanon) यांच्यात १० दिवसांचा युद्धविराम लागू झाला असून; तो सध्या कायम असल्याचे दिसते. तरीही इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांनी हिझबुल्लाविरोधातील कारवाई अद्याप संपलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. हिझबुल्लानेही पुढील भूमिका परिस्थितीनुसार ठरवणार असल्याचे म्हटले आहे.
लेबनॉनमध्ये कुटुंबे परतू लागली
या संघर्षामुळे लेबनॉनमध्ये मोठ्या प्रमाणावर हानी झाली असून, हजारो नागरिकांना विस्थापित व्हावे लागले आहे. युद्धविरामामुळे आता अनेक कुटुंबे पुन्हा घरी परतण्यास सुरूवात करत आहेत.