शिरोड्यात ७ कोटींचे ‘अंबरग्रीस’ जप्त; सिंधुदुर्गात वनविभागाची मोठी कारवाई

४ संशयित ताब्यात : आंतरराष्ट्रीय तस्करीचा प्रयत्न उधळला

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th April, 11:14 pm
शिरोड्यात ७ कोटींचे ‘अंबरग्रीस’ जप्त; सिंधुदुर्गात वनविभागाची मोठी कारवाई

वेंगुर्ले : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अत्यंत मौल्यवान मानल्या जाणाऱ्या ‘अंबरग्रीस’ची (ब्लू व्हेल माशाची उलटी) बेकायदेशीर विक्री करण्याचा प्रयत्न वेंगुर्ले वनविभागाने उधळून लावला आहे. शिरोडा परिसरात गुरुवारी (१६ एप्रिल) सायंकाळी करण्यात आलेल्या या धाडसी कारवाईत सुमारे ९ किलो १०० ग्रॅम अंबरग्रीस जप्त करण्यात आले असून, त्याची बाजारपेठेतील अंदाजे किंमत तब्बल ७ कोटी रुपये आहे. या प्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
शिरोडा परबगाव परिसरात काही व्यक्ती ब्लू व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती फिरते पथकाचे वनक्षेत्रपाल सचिन शिडतुरे यांना मिळाली होती. माहिती मिळताच वरिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तयार करण्यात आली. तस्करांना पकडण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ‘बनावट ग्राहक’ बनून सापळा रचला आणि व्यवहाराच्या वेळी या चारही जणांना रंगेहात पकडले.
या कारवाईत खालील रणजित रामचंद्र नायर (वय ४०, रा. परबगाव-शिरोडा), गुरुनाथ नाईक (वय ७०, रा. परबगाव-शिरोडा), विभव आडारकर (वय ३५, रा. शिरोडा), निलेश मनोहर पांडजी (वय ३३, रा. रेडी) यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयितांकडून ९.१२० किलो ग्रॅम वजनाचे अंबरग्रीस जप्त करण्यात आले आहे. ब्लू व्हेल हा प्राणी वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसूची १ मध्ये येत असल्याने त्याचा कोणताही उपपदार्थ बाळगणे किंवा त्याची विक्री करणे हा गंभीर गुन्हा आहे. सुगंधी द्रव्ये आणि औषधांसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याला मोठी मागणी असल्याने पैशांच्या हव्यासापोटी ही तस्करी केली जात असल्याचे समोर आले आहे.
वनविभागाचे आवाहन
सदरची कारवाई सावंतवाडी आणि कुडाळ वनविभागाच्या संयुक्त पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. अशा प्रकारे अंबरग्रीस किंवा कोणत्याही वन्यप्राण्यांचे अवशेष आढळल्यास तत्काळ वनाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन वनक्षेत्रपाल सचिन शिडतुरे यांनी केले आहे.

हेही वाचा