होर्मुझमध्ये तणाव वाढला: अमेरिकेने १० इराणी जहाजे परत पाठवली

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
7 hours ago
होर्मुझमध्ये तणाव वाढला: अमेरिकेने १० इराणी जहाजे परत पाठवली

तेहरान : पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने इराणविरोधात कडक भूमिका घेतली आहे.  इराणच्या बंदरांतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणारी १० जहाजे परत पाठवण्यात आल्याची माहिती अमेरिकेच्या लष्कराने दिली आहे. अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे गेल्या तीन दिवसांत एकही जहाज होर्मुझ सामुद्रधुनी (strait of hormuz) ओलांडू शकलेले नाही.

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनुसार (CENTCOM) ही नाकेबंदी सोमवारी सुरू करण्यात आली. इराणच्या सागरी हालचालींवर कडक नियंत्रण ठेवण्यात आले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

तर परिस्थिती अधिक चिघळणार : इराणचा इशारा

दरम्यान, इराणने इशारा दिला आहे की, जर अमेरिकेने ही नाकेबंदी हटवली नाही, तर ते खाडी प्रदेशातील व्यापारात अडथळे निर्माण करू शकतात, ज्यामुळे परिस्थिती अधिक चिघळू शकते.

३४ वर्षांनंतर इस्त्रायल-लेबननमध्ये होणार चर्चा 

या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)  यांनी जाहीर केले की, इस्रायल आणि लेबननचे नेते थेट चर्चा करणार आहेत. तब्बल ३४ वर्षांनंतर या दोन देशांमध्ये थेट संवाद होणार असून, याआधी १९९१ मध्ये दोन्ही देशांचे नेते समोरासमोर आले होते.

अमेरिका, इराणमध्ये शांतता करार होण्याची शक्यता 

दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यात २१ एप्रिलपर्यंत लागू असलेल्या युद्धविरामापूर्वी शांतता करार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन्ही देशांमध्ये चर्चेची चर्चेची प्रक्रिया पुढे सरकत असली, तरी काही मतभेद अद्याप कायम आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, संभाव्य करारासाठी युद्धविरामाची मुदत वाढवली जाऊ शकते.  मात्र याबाबत अमेरिकेकडून अद्याप औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही.

हेही वाचा