पाच वर्षांत चार मृत्यूंची नोंद : भिरोंडा पंचायत सुरक्षा कवच निर्माण करण्यासाठी घेणार पुढाकार

वाळपई : सध्या वाढत्या उष्णतेमुळे सत्तरी तालुक्यातील म्हादई नदीच्या पात्रात आंघोळीसाठी पर्यटकांची आणि स्थानिकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, भिरोंडा पंचायत इमारतीच्या मागील बाजूचे नदीपात्र धोकादायक बनले असून, येथे वारंवार होणाऱ्या बुडून मृत्यूच्या घटनांमुळे खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर भिरोंडा पंचायतीने आता कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला असून, सुरक्षेच्या दृष्टीने विशेष उपाययोजना आखल्या आहेत.
पाच वर्षांत चार बळी; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
भिरोंडा येथील नदीपात्रात गेल्या पाच वर्षांत जवळपास चार जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चार दिवसांपूर्वीच गोवा वेल्हा येथील रजत काणकोणकर (२१ वर्षे) या तरुणाचा येथे बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे या ठिकाणच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. येथील पात्र खडकाळ असून काही ठिकाणी खोलीचा अंदाज येत नसल्याने पोहता न येणाऱ्या व्यक्तींसाठी हे ठिकाण जीवघेणे ठरत आहे.
पर्यटनस्थळ विकासाचा प्रस्ताव प्रलंबित
आम्ही या परिसराला सुरक्षित पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचा प्रस्ताव पर्यटन खात्याकडे यापूर्वीच सादर केला आहे. मात्र, त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही, अशी माहिती राणे यांनी दिली. नदीपात्रात काही ठिकाणी चिखल असल्याने पाय रुतून दुर्घटना घडण्याची शक्यता असते, त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
नागरिकांना सहकार्याचे आवाहन
उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी नदीवर जाणाऱ्या नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. केवळ मौजमजेसाठी जीव धोक्यात घालू नये आणि पंचायतीने घेतलेल्या निर्णयांना सहकार्य करावे, अशी विनंती सरपंच उदयसिंग राणे यांनी केली आहे.
पंचायतीकडून महत्त्वाच्या उपाययोजना
सरपंच उदयसिंग राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी पंचायत शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवसात या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी पोलीस खात्याशी लवकरच पत्रव्यवहार करणार आहे. शक्य असल्यास या ठिकाणी कायमस्वरूपी जीवरक्षक नेमण्याचा पंचायतीचा विचार आहे, जेणेकरून आपत्कालीन स्थितीत मदत मिळू शकेल. याशिवाय, नदीपात्रातील धोकादायक ठिकाणांची माहिती देणारे आणि पर्यटकांना सतर्क करणारे फलक ठिकठिकाणी लावले जातील.