गोव्यातील सांगोल्डा येथे ऑनलाईन आयपीएल बेटिंग रॅकेट उध्वस्त; सहा जणांना अटक

१० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; सायबर क्राईम पोलिसांची कारवाई

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
16th April, 11:57 am
गोव्यातील सांगोल्डा येथे ऑनलाईन आयपीएल बेटिंग रॅकेट उध्वस्त; सहा जणांना अटक

पणजी : आयपीएल स्पर्धा (IPL Cricket) ) रंगात आली असतानाच या स्पर्धेवर मोठ्या प्रमाणात ऑनलाईन सट्टेबाजी (Online IPL betting)  सुरू असल्याचे दिसून आले आहे. गोव्यात (Goa)  सांगोल्डा येथे सायबर क्राईम पोलिसांनी (Cyber Crime Police)  टाकलेल्या धाडीत आयपीएलवरील ऑनलाईन बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश केला. आणि सहा जणांना अटक केली. 

१५ एप्रिलला रात्री ९ वाजण्याच्या सुमारास धाड टाकण्यात आली. ही कारवाई मध्यरात्रीपर्यंत सुरू होती.  या धाडीत संशयितांकडून ६ लॅपटॉप, ३१ हजार रुपये रोख, ५० एटीएम कार्ड्स, अनेक म्युल अकाउंट किट्स, मोबाईल फोन असा एकूण सुमारे १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

संशयित ‘एमजी लायन’ ( ‘MG Lion’)  आणि ’काबुक १’ ( ‘Kabook 1’)  या बेटिंग अ‍ॅप्सच्या माध्यमातून विविध मोबाईल व वाय-फाय कनेक्शनचा वापर करून क्रिकेट सट्टा स्वीकारला जात होता.  तसेच वेगवेगळ्या नावाने नोंदणीकृत खात्यांद्वारे पैसे फिरवून जुगाराचा अड्डा चालवत असल्याचे तपासात उघड झाले.

अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये गुजरात, राजस्थान आणि पश्चिम बंगाल येथील सहा जणांचा समावेश आहे. गेडिया राज दिलीपभाई (सूरत, गुजरात), भीमराज मीना (उदयपूर, राजस्थान), निलेश हिराणी (सूरत, गुजरात), शनि दीपकभाई चावडा (सूरत, गुजरात),  रोकड यश जयसुखभाई (अमरेली, गुजरात) आणि प्रशांत त्रिवेदी (बर्धमान, पश्चीम बंगाल) अशी त्यांची नावे आहेत. 

या प्रकरणी सर्व संशयितांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६-सी सह भारतीय न्याय संहिता कलम ३(५) तसेच गोवा पोलीस जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ व ४ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सायबर क्राईम शाखेचे पोलीस अधीक्षक राजू राऊत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर, उपनिरीक्षक नवीन नाईक तसेच इतरांनी ही कारवाई केली. 

हेही वाचा