‘रेड कॅटेगरी’तील प्रकल्पांना नो एंट्री!

मुख्यमंत्री डॉ. सावंत : कुंकळ्ळीतील विविध विकासकामांची पायाभरणी, लोकार्पण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th April, 11:28 pm
‘रेड कॅटेगरी’तील प्रकल्पांना नो एंट्री!

मडगाव : लोकांच्या आरोग्याला आणि पर्यावरणाला हानी पोहोचवणारा कोणताही ‘रेड कॅटेगरी’तील प्रकल्प सरकार कुंकळ्ळीत आणणार नाही. औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कडक लक्ष असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
कुंकळ्ळी येथील विविध विकासकामांच्या पायाभरणी आणि लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्टा, स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष रोहिदास देसाई, डॉ. प्रकाश कुर्‍हाडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत गेल्या अनेक वर्षांपासून पडून असलेल्या धोकादायक कचऱ्याचा प्रश्न आता सुटणार आहे. मुख्यमंत्री म्हणाले, हा कचरा कुणाच्या काळात निर्माण झाला हे विरोधकांना ठाऊक आहे. मात्र, कुंकळ्ळीवासीयांच्या आरोग्यासाठी सरकार १३ कोटी रुपये खर्चून १ मे पासून हा कचरा उचलण्याचे काम सुरू करणार आहे. हा कचरा सुरक्षित ठिकाणी नेऊन त्यावर प्रक्रिया केली जाईल.
विरोधी पक्षनेत्यांच्या उपस्थितीत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, राजकारण आणि विकास या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मी संपूर्ण राज्याचा मुख्यमंत्री आहे. विरोधी पक्षातील आमदारांचा मतदारसंघ असला तरी, तेथील लोकांच्या हिताच्या कामांना प्रशासकीय किंवा वित्तीय मंजुरी देताना मी कधीही हात आखडता घेतलेला नाही. युरी आलेमाव यांनी आज विकासकामांचे कौतुक केले, हे पाहून समाधान वाटले.
कुंकळ्ळीसाठी महत्त्वाच्या घोषणा
मुख्यमंत्री म्हणाले, कुंकळ्ळीत १५ खाटांच्या सर्वसोयींयुक्त शहरी आरोग्य केंद्राचे काम दीड वर्षात पूर्ण होईल. सोनसडोप्रमाणेच राज्यातील जुना कचरा साफ करण्याचे काम सुरू आहे. साळगाव, कुडचडे, कुंडई आणि पिसुर्ले येथील प्रकल्पांमुळे गोवा स्वच्छ होत आहे. पारोडा आणि गिरदोली पंचायत घरांची पायाभरणी करण्यात आली असून, तेथे सार्वजनिक हॉलची सोय असेल. कुंकळ्ळीत नवीन फुटसाल मैदान उभारले असून तरुणांनी त्याचा लाभ घ्यावा. अर्थसंकल्पात दिलेल्या आश्वासनांपैकी ९९ टक्के कामे सरकारने पूर्ण केली असून त्याचा अहवाल जनतेसमोर मांडला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
स्वच्छता मोहिमेसाठी नागरिकांनीही सहकार्य करावे
मागील सात वर्षांत सरकारने कचरा व्यवस्थापनात मोठी क्रांती केल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. आम्ही केवळ घोषणा केल्या नाहीत, तर प्रत्यक्ष प्रकल्प उभे केले. गोवा सुंदर आणि नितळ राखण्याची जबाबदारी केवळ सरकारची नसून नागरिकांनीही त्यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. युवकांनी केवळ सरकारी नोकरीच्या मागे न लागता खासगी क्षेत्रातही संधी शोधल्यास त्यांना सरकार पूर्ण सहकार्य करेल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

हेही वाचा