आश्वेतील डल्लास रिसॉर्टला भीषण आग; रस्ता नसल्याने अग्निशमन दलाच्या कामात अडथळा

पर्यटन मंत्र्यांकडून गोव्यातील सर्व पर्यटन आस्थापनांच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्याची घोषणा.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
5 hours ago
आश्वेतील डल्लास रिसॉर्टला भीषण आग; रस्ता नसल्याने अग्निशमन दलाच्या कामात अडथळा

पेडणे: उत्तर गोव्यातील आश्वे-मांद्रे येथील ‘डल्लास बीच रिसॉर्ट’मधील आलिशान कॉटेजेसना गुरुवारी रात्री भीषण आग लागली. या दुर्घटनेत सुमारे ६ ते ७ कॉटेजेस जळून खाक झाले असून, कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. सुदैवाने, आगीच्या वेळी कॉटेजेसमध्ये कोणीही पर्यटक नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली असली, तरी अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी रस्ता नसल्याने आग विझवण्यात मोठे अडथळे निर्माण झाले.



माहितीनुसार, गुरुवारी रात्री ८.४५ च्या सुमारास ही आग लागली. साहित्याच्या स्वरूपामुळे आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच पेडणे, म्हापसा आणि पर्वरी येथील अग्निशमन दलाच्या बंबांना पाचारण करण्यात आले. मात्र, रिसॉर्टपर्यंत पोहोचण्यासाठी पुरेशी जागा आणि रस्ता उपलब्ध नसल्याने जवानांना मोठी कसरत करावी लागली. रिसॉर्टमधील पाण्याची टाकीही अपुरी पडल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले होते. सुमारे पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पहाटे ३ वाजेच्या सुमारास आग आटोक्यात आली. एकूण ३० पैकी २६ कॉटेजेस वाचवण्यात जवानांना यश आले.



ही आग केवळ एक अपघात नसून बेकायदेशीर बांधकामाचा गंभीर मुद्दा असल्याचे समोर आले आहे. स्थानिक पंचायतीच्या मते, हे कॉटेजेस सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून आणि कोणतीही सरकारी परवानगी न घेता उभारण्यात आले होते. तत्कालीन सरपंच अ‍ॅड. अमित सावंत यांनी हे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते, मात्र पंचायत संचालनालयाकडून त्याला स्थगिती मिळवण्यात आली होती. विद्यमान सरपंच किरण सावंत यांनीही हे रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याचे सांगत ते सील करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच ही घटना घडल्याचे स्पष्ट केले.



या घटनेचे गांभीर्य ओळखून पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मुळात, आश्वे किनाऱ्यावरील आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या या शॅकची नोंदणी हॉटेल म्हणून झाली आहे, त्याबाबत त्यांनी सविस्तर अहवाल मागवला आहे. खऱ्या अर्थाने ही नोंदणी खाजगी शॅक म्हणून व्हायला हवी होती, असे त्यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर, राज्यातील सर्व पर्यटन आस्थापनांच्या नोंदणीची वैधता तपासण्यासाठी पर्यटन संचालकांच्या नेतृत्वाखाली एक विशेष समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा मंत्र्यांनी केली.


अन्य एका माहितीनुसार, ज्या जागेत हे रिसॉर्ट उभारले होते, त्या जागेवरून स्थानिक देवस्थान समिती आणि व्यावसायिक यांच्यात आधीपासूनच वाद सुरू होता. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीच्या वेळी काही पर्यटकांचे मौल्यवान सामान कॉटेजेसमध्ये होते, जे स्थानिकांनी प्रसंगावधान राखून बाहेर काढले.

हेही वाचा