सासष्टीतील पंचायतींची पर्यटन खात्याकडे मागणी

पणजी : ‘दृष्टी’ (Drishti) आणि समुद्रकिनारे स्वच्छ करणाऱ्या कंत्राटदाराला किनाऱ्यांवर (beaches of Goa) फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा (stray dogs) बंदोबस्त करण्याचे कंत्राट देण्यात यावे. तसेच पाळीव कुत्र्यांच्या गळ्यात बिल्ला लावावा आणि भटक्या कुत्र्यांसाठी डोंगराळ भागात निवारा केंद्र उभारावे, अशी मागणी सासष्टी तालुक्यातील किनारी भागातील पंचायतींनी केली आहे.
भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर चर्चा करण्यासाठी पर्यटन खाते आणि सासष्टी तालुक्यातील पंचायतींच्या सरपंचांची बैठक पार पडली. या बैठकीत पर्यटन संचालकांसह पशुवैद्यकीय खात्याचे अधिकारी, पंचायत संचालनालयाचे अधिकारी, ‘मिशन रॅबीज’ आणि इतर तज्ज्ञ उपस्थित होते.
बैठकीनंतर माहिती देताना बाणावलीचे सरपंच डिक्सन वाझ यांनी सांगितले की, भटक्या कुत्र्यांकडून पर्यटकांचा पाठलाग केला जातो आणि त्यांना त्रास दिला जातो. या संदर्भात अनेकदा पत्रव्यवहार केला, परंतु अद्याप कोणीही याची दखल घेतलेली नाही.
पर्यटन खाते 'दृष्टी' आणि किनारा स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करते. खात्याने या कंत्राटदारांना प्रशिक्षण देऊन, जी आक्रमक कुत्री आहेत त्यांना पकडण्याची जबाबदारी द्यावी, अशी सूचना आम्ही केली आहे. ही मागणी मान्य करून या संदर्भात प्रस्ताव तयार करण्यास सांगण्यात आले आहे. पूर्वी कुत्र्यांना जसे बिल्ले लावले जायचे, ती पद्धत पुन्हा सुरू करून कुत्र्याच्या पट्ट्यावर मालकाचे नाव आणि पत्ता असलेला बिल्ला असावा, असा सल्लाही वाझ यांनी दिला.
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करताना ग्रामीण भागातील डोंगराळ किंवा वनक्षेत्रात त्यांच्यासाठी निवारा केंद्रे उभारावीत. त्यांना एका छोट्या जागेत कैद करण्याऐवजी ३० हेक्टरपर्यंतच्या वनक्षेत्रात मोकळी जागा शोधावी, जिथे त्यांना फिरण्याचे स्वातंत्र्य मिळेल, अशी सूचना वाझ यांनी मांडली.
पर्यटक हे आमच्या उपजीविकेचे साधन आहेत. जर कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आणि पर्यटक कमी झाले, तर आमचे तरुण बेरोजगार होतील. या बैठकीत आम्हाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, तरीही आम्ही आमचे मुद्दे स्पष्टपणे मांडले आहेत.
- डिक्सन वाझ,
बाणावलीचे सरपंच
किनारी भागात मोठ्या प्रमाणात भटकी कुत्री असून ती लोकांना चावा घेतात. जे ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर किंवा किनाऱ्यावर फिरायला जायचे, ते आता भीतीने घरात बसून आहेत.वनक्षेत्रात निवारा घर बनवण्याची मागणी
- मेनो फर्नांडिस,
बेताळभाटीचे सरपंच