दोडामार्ग पोलीस रात्री धावले मदतीला... नेमके काय घडले, वाचा.

दोडामार्ग: सिंधुदुर्गातील दोडामार्गमधील विर्डी परिसरात असलेला निसर्गरम्य 'वजरा सकला' धबधबा पर्यटकांसाठी जितका आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे, तितकाच तो या परिसराशी अनभिज्ञ असलेल्या व्यक्तींसाठी धोकादायकही ठरू शकतो, याचा प्रत्यय गोव्यातील पाच विद्यार्थ्यांना आला. सहलीचा आनंद लुटण्यासाठी गेलेले हे विद्यार्थी परतीचा मार्ग विसरून घनदाट जंगलात अडकले. हे ठिकाण अनेक हिंस्र प्राण्यांचा-सरीसृपांचा अधिवास आहे. अंधारात तब्बल चार तास ते मृत्यूच्या सावटाखाली वावरले. मात्र, पोलिसांची तत्परता आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे हे सर्वजण सही सलामत बचावले.
फोंडा-गोवा येथील चार तरुण आणि एक तरुणी असे एकूण पाच जण विर्डी येथील धबधबा पाहण्यासाठी आले होते. दिवसभर निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यानंतर सायंकाळी उशिरा त्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. मात्र, अंधार पडल्याने आणि जंगलातील रस्ते सर्वत्र सारखेच दिसत असल्याने हे विद्यार्थी मुख्य रस्ता सोडून जंगलात अधिक खोलवर गेले. सभोवताली अस्वले, वाघ आणि कोल्हे यांसारख्या हिंस्र प्राण्यांचा वावर, पावला पावलावर क्षीण होत चाललेला मोबाईलचा नेटवर्क आणि सोबत क्षणाक्षणाला गडद होत जाणारा काळोख यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात भीतीचे काहूर माजले.
जेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेली, तेव्हा त्यांनी शेवटचा प्रयत्न म्हणून सायंकाळी ७:१५ वाजता '११२' या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधला. हा कॉल नागपूर नियंत्रण कक्षात प्राप्त होताच क्षणाचाही विलंब न लावता ही माहिती सिंधुदुर्ग पोलिसांना देण्यात आली. दोडामार्ग पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक मानसी गावडे आणि पोलीस हवालदार बाळकृष्ण गवस यांनी तातडीने विर्डी गाव गाठले. मात्र, पुढे जाण्यासाठी कोणताही वाहन मार्ग उपलब्ध नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे होते. पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थ आणि तळेखोल पोलीस पाटील यांच्या मुलाची मदत घेत पायी शोधमोहीम हाती घेतली.
हातात टॉर्च आणि मनात जिद्द घेऊन पोलीस आणि ग्रामस्थांचे पथक जंगलात उतरले. दुसरीकडे, हे विद्यार्थी एका नदीकाठी भीतीने थरथरत मदतीची वाट पाहत होते. रात्री १०:४५ च्या सुमारास, जेव्हा जंगलात पोलिसांच्या हाका घुमल्या, तेव्हा या विद्यार्थ्यांच्या जीवात जीव आला. 'वजरा सकला' धबधब्याजवळ या पाचही जणांचा शोध लागला. पोलिसांना पाहताच या विद्यार्थ्यांच्या जीवात जीव आला. पोलिसांनी त्यांना धीर दिला. अत्यंत काळजीपूर्वक जंगलातून बाहेर घेऊन आले आणि सुरक्षित स्थळापर्यंत पोहोचवले.
सध्या गोव्यात आणि पर्यायाने सर्वत्रच उकाडा वाढला आहे. त्यापासून थोडा आराम मिळावा म्हणून हे येथील धबधब्यावर सर्वजण येथे आले होते. विर्डीचे जंगल हे वन्यप्राण्यांचे नैसर्गिक अधिवास असल्याने पर्यटकांनी सायंकाळनंतर तिथे थांबणे धोक्याचे आहे. या मोहिमेत दोडामार्ग पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि ग्रामस्थांनी दिलेली साथ यामुळेच या पाचही विद्यार्थ्यांचे प्राण वाचू शकले. या पाचही जणांसाठी दोडामार्ग पोलीस खऱ्या अर्थाने 'देवदूत' ठरले असून, त्यांच्या या धाडसी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.