घोड्यावरून रस्त्यावर फेरफटका मारला म्हणून झाली पोलीस तक्रार, त्यावरच स्वार होत स्थानकात हजर

सोशल मीडियावर डिचोलीच्या कनिष्क पेडणेकरची चर्चा; नेटकरी म्हणाले- पेट्रोल दरवाढीच्या काळात प्रवासाचा हा हटके पर्याय.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
घोड्यावरून रस्त्यावर फेरफटका मारला म्हणून झाली पोलीस तक्रार, त्यावरच स्वार होत स्थानकात हजर

डिचोली : काळाच्या ओघात राजे-महाराजांची घोडेस्वारी आणि रथांचा प्रवास इतिहासजमा झाला असला, तरी त्याचा 'रॉयल स्वॅग' आणि त्याप्रति असलेले आकर्षण आजही कायम आहे. सध्या डिचोलीत एका युवकाच्या याच स्वॅगने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कनिष्क पेडणेकर हा युवक चक्क घोड्यावर स्वार होऊन डिचोली पोलीस स्थानकात काय हजर झाला, याची चर्चा आता संपूर्ण राज्यभर होत आहे. सोशल मीडियावर कनिष्कच्या घोडेस्वारीचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एका बाजूला मिश्किल टिप्पण्या, कौतुक, तर दुसऱ्या बाजूला प्राणीमित्रांच्या आक्षेपांमुळे हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले.




काही दिवसांपूर्वी कनिष्कचा घोडेस्वारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडिओवर काही प्राणीप्रेमींनी आक्षेप नोंदवला होता की, डांबरी रस्त्यावरून घोड्याला पळवल्याने त्याच्या खुरांना इजा पोहोचू शकते. यावरून प्राणी क्रूरता कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. एका व्यक्तीने याप्रकरणी डिचोली पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर, कनिष्कने पोलिसांच्या नोटिसीला उत्तर म्हणून थेट घोड्यासह पोलीस स्थानकात जाण्याचा निर्णय घेतला.



पोलीस स्थानकात पोहोचल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोड्याची सखोल तपासणी केली. या तपासणीत घोड्याला कोणतीही इजा झालेली नाही किंवा त्याला कोणताही शारीरिक त्रास नाही, असा स्पष्ट अहवाल डॉक्टरांनी दिला. कनिष्कने यावेळी आपली बाजू मांडताना सांगितले की, घोडे पाळणे ही सोपी गोष्ट नाही. त्यांच्या खाद्यासाठी आणि निगा राखण्यासाठी मोठा खर्च आणि मेहनत करावी लागते. प्राणीप्रेमींना केवळ बाह्य दृश्य पाहून आपण त्यांची काळजी घेत नाही असे वाटते, परंतु प्रत्यक्षात या मुक्या प्राण्यांची मुलाप्रमाणे काळजी घेतली जाते, असा खुलासाही त्याने केला.



महत्त्वाची बाब म्हणजे, सध्याच्या काळात प्रवासासाठी घोडा रस्त्यावर वापरू नये, असा कोणताही स्पष्ट कायदा अस्तित्वात नाही. दुसरीकडे, इराण-इस्रायल तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, "पेट्रोलच्या वाढत्या दरांना घोडेस्वारी हा एक उत्तम आणि प्रदूषणमुक्त पर्याय असू शकतो," अशा रंजक प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून उमटत आहेत. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कनिष्क पुन्हा एकदा आपल्या लाडक्या घोड्यावर स्वार होऊन दिमाखात घरी परतला. कनिष्कची ही शैली सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरली असून, आधुनिक काळात प्राचीन साधनांचा हा वापर अनेकांसाठी कुतूहलाचा ठरला आहे.


हेही वाचा