महिला आमदारांना मंत्रिमंडळात स्थान द्या

आमदार देविया राणे, डिलायला लोबो यांची मागणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17 mins ago
महिला आमदारांना मंत्रिमंडळात स्थान द्या

पणजी : संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयकाच्या अंमलबजावणीवर होणाऱ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर, गोव्यातील महिला आमदारांना मंत्रिमंडळात मंत्रिपद द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. मंत्रिमंडळात महिलांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे करणार आहोत, असे आमदार देविया राणे आणि आमदार डिलायला लोबो यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने बुधवारी पणजी येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार देविया राणे आणि आमदार डिलायला लोबो बोलत होत्या. या परिषदेला महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर, आरती बांदोडकर आणि रेशमा बांदोडकर उपस्थित होत्या.
महिलांना सन्मान आणि हक्काची जागा मिळवून देण्यासाठी संसदेत नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयक संमत झाले आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीवर संसदेत आजपासून चर्चा होणार आहे. या ऐतिहासिक विधेयकाला सर्वांनी पाठिंबा देण्याची गरज आहे, असे आवाहन दोन्ही महिला आमदारांनी यावेळी केले.
या विधेयकामुळे संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे. यामुळे महिला आमदार आणि खासदारांची संख्या वाढून त्यांना सरकारमध्ये सहभागी होण्याची मोठी संधी मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने उचललेले हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. आतापर्यंत ‘महिलांचा विकास’ अशी संकल्पना होती, परंतु यापुढे ‘महिलांच्या नेतृत्वाखाली विकास’ अशी संकल्पना प्रत्यक्षात येईल, असे आमदार लोबो यांनी नमूद केले. आमदार देविया राणे म्हणाल्या की, आज सर्वच क्षेत्रांत महिला उच्च पदावर पोहोचल्या आहेत. या आरक्षणामुळे गोव्यातही महिला लोकप्रतिनिधींची संख्या निश्चितपणे वाढेल.

हेही वाचा