दुचाकीसह पाच लाख रुपयांचा ऐवज जप्त

डिचोली : गोवा व महाराष्ट्रात घरफोडी करून घरातील विविध उपकरणे तसेच दुचाकी चोरी करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात डिचोली पोलिसांना यश आले आहे. या टोळीकडून एका दुचाकीसह सुमारे पाच लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. डिचोली पोलिसांनी तीन जणांच्या टोळीकडून एकूण ४३ नग जप्त केले आहेत.
याबाबत, १४ एप्रिल रोजी डिचोली येथील जयेंद्र लाडूलो गावस यांनी त्यांच्या सुरू असलेल्या घरकामाच्या ठिकाणी चोरांनी चोरी केल्याची तक्रार नोंदवली होती. या चोरीत लॅपटॉप व चार्जर, लॅपटॉप स्टँड, स्मार्ट हेल्मेट, इलेक्ट्रिक इंडक्शन स्टोव्ह आणि सुमारे १,००० रुपये रोख असा मिळून सुमारे ९० हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला होता.
या प्रकरणी डिचोली पोलिसांनी गुन्हा नोंदवून पोलीस निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आकाश पवार यांच्याकडे तपास सोपवण्यात आला. तपासादरम्यान विविध माध्यमांतून माहिती गोळा करताना माडेल-थिवी, बार्देश येथील आरिफ फुल मोंडल (वय २२, मूळ पश्चिम बंगाल) याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला.
या संशयावरून डिचोली पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक आकाश परवार, रश्मीर मातोंडकर, सहाय्यक उपनिरीक्षक लक्ष्मण घाडी, हवालदार आत्मा गावकर, पोलीस कॉन्स्टेबल दयेश खांडेपारकर, विशाल परब, संदीप पावले, सिद्धार्थ नाईक, संतोष गावस या पथकाने पोलीस निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आरिफ फुल मोंडल याच्या घरी छापा मारला. छाप्यात घरातून मोठ्या प्रमाणात घरगुती समान आढळून आले.
त्यात व्हि गार्ड गिझर, टेबल फॅन, भिंतीवरील फॅन, डीव्हीडी संच, इस्त्री, डी लिंक राऊटर, मार्बल कटर, कलर मिक्सर, सिलिंग फॅन, इलेक्ट्रिक इंडक्शन स्टोव, इलेक्ट्रॉनिक वोल्टेज स्टेबलाइजर, टेलिफोन रिसिव्हर, हॅन्ड ग्राइंडर, डीव्हीडी कॅमेरा, हॅन्ड केम, एलईडी टीव्ही, टाटा स्काय रिसिवर, स्मार्ट हेल्मेट, इलेक्ट्रिक किटल, शॉवर ग्राइंडर, मोबाईल फोन, एक फसिनो स्कूटर व मोठ्या प्रमाणात सामान आढळून आले. हे सर्व सामान जप्त करून आरिफ याला डिचोली पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. त्याने आपल्या दोन साथीदारांची नावे सांगितल्यावर त्यांनाही अटक करण्यात आली.
या तिघांचा गोवा व महाराष्ट्रातील व इतर प्रकारच्या चोऱ्यांमध्ये सहभाग असल्याचे चौकशीअंती आढळून आले आहे. याप्रकरणी उत्तर गोवा पोलीस अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर, डिचोली पोलीस उपअधीक्षक श्रीदेवी बि. व्ही., पोलीस निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आकाश परवार अधिक तपास करीत आहेत.
आरिफच्या दोघा साथीदारांना अटक
आरिफ याची अधिक चौकशी केली असता त्याने बाप्पा खागन मोंडल (वय २३, रा. मलपूर पश्चिम बंगाल) व अली आझम मुशीचूर मुल्ला (वय ३०, रा. भोलानाथपूर पश्चिम बंगाल) हे दोघेही या चोरीच्या प्रकरणात सहभागी असल्याचे सांगितले. या माहितीवरून डिचोली पोलिसांनी त्या दोघांनाही ताब्यात घेऊन अटक केली.