आत्महत्येच्या प्रयत्नात गंभीर जखमी अश्पाक खानचे निधन

कर्जबाजारीपणाला कंटाळून उचलले होते पाऊल

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
11th April, 11:58 pm
आत्महत्येच्या प्रयत्नात गंभीर जखमी अश्पाक खानचे निधन

म्हापसा : मुड्डोवाडा साळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वत:ला आग लावून घेतलेल्या अश्पाक खान (५०, रा. कळंगुट व मूळ महाराष्ट्र) या हॉटेल व्यावसायिकाचे गोवा वैद्यकीय इस्पितळात उपचारावेळी निधन झाले.

ही घटना शुक्रवार, दि. १० रोजी सायंकाळी मुड्डोवाडा साळगाव येथील रवी नामक पूर्वाश्रमीच्या व्यावसायिक भागीदाराच्या घरावर अश्पाक याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. अंगावर पेट्रोल ओतून आग लावून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात तो ९५ टक्के भाजला होता. त्याचे बरेच अवयव जळाल्यामुळे डॉक्टरांच्या उपचारांना त्याच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही व शनिवारी पहाटेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

शनिवारी सकाळी गोवा वैद्यकीय इस्पितळात शवचिकित्सा झाल्यानंतर त्याचा मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. यानंतर मृतदेह घेऊन सदर कुटुंबीय आपल्या मूळ गावी महाराष्ट्रमध्ये रवाना झाले.

दरम्यान, घटनेच्यावेळी अश्पाक हा आपल्या मोटारसायकलवरून साळगाव येथे आला. पूर्वीच्या व्यावसायिक भागीदाराच्या घरासमोर त्याने आपली दुचाकी पार्क केली व तो थेट तीन मजली घराच्या टेरेसवर चढला. त्याने सोबत पेट्रोल भरलेली बाटली नेली होती. हा प्रकार तेथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये बंदीस्त झाला आहे. शिवाय त्याच्यासोबत टेरेसवर कुणीही गेला नव्हता. आपल्या अनेक मित्रांना अश्पाक खान याने कर्जबाजारी झाल्याचे सांगितले होते. त्यामुळे हा घातपात नसून आत्महत्या असल्याचे पोलीस चौकशीतून आढळून आले आहे.

याप्रकरणी साळगाव पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून प्रकरण नोंद केले आहे. पुढील तपास साळगाव पोलीस करीत आहेत.

व्यावसायिक भागीदारासोबत होते वाद

अश्पाक हा रवीसोबत भागीदारीवर तीन हॉटेल्स चालवत होता. करोना काळात व्यवसाय ठप्प झाल्यामुळे तो कर्जात बुडाला होता. नंतर रवी याने त्याच्यासोबतची भागीदारी तोडली होती. त्यापासून त्यांच्यात वैरत्व होते. दोन वर्षांपूर्वी त्यांच्यामध्ये कळंगुट येथे भांडण झाले होते. त्यापासून दोघांमध्ये संभाषण नव्हते, असेही पोलीस चौकशीत उघडकीस आले आहे. 

हेही वाचा