नावेली येथील मदरसा संस्थेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप

अध्यक्षांसह समिती सदस्यांविरुद्ध तक्रार दाखल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
27th May, 11:49 pm
नावेली येथील मदरसा संस्थेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप

मडगाव : नावेली येथील मदरसा अहले सुन्नत अनवर ए रजा या संस्थेच्या कारभारात आर्थिक गैरव्यवहार आणि फसवणूक झाल्याचा आरोप करत, संस्थेचे संस्थापक सदस्य अब्दुल सत्तार यांनी मडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीत संस्थेचे अध्यक्ष मेहबूब कलहोली, रफिक हाथीमातुर, हुसेन कलहोली आणि इतर समिती सदस्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली. तक्रारदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले की, संस्थेच्या सुमारे ५० संस्थापक सदस्यांना अंधारात ठेवून विद्यमान समितीने बेकायदेशीरपणे ताबा मिळवला आहे. समितीने बनावट कागदपत्रे तयार करून आणि पोटनियमांचे उल्लंघन करून संस्थेची सूत्रे हाती घेतली. सार्वजनिक निधीचा आणि समाज बांधवांच्या पैशांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे मशिदीच्या आवारात अनधिकृतपणे प्रवेश करण्यात आला आहे. समिती स्थापन करताना आवश्यक असलेली दोन तृतीयांश बहुमताची अट पाळली गेली नाही, तसेच सदस्यांना कोणतीही नोटीस बजावण्यात आली नव्हती.

त्यामुळे संशयित आरोपींविरुद्ध तत्काळ एफआयआर नोंदवण्यात यावा. तपास पूर्ण होईपर्यंत या समितीला संस्थेच्या कामात हस्तक्षेप करण्यापासून रोखावे. निधीचा गैरवापर आणि बनावट कागदपत्रांची सखोल चौकशी व्हावी. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही नमूद केलेले आहे.

२८ मे रोजी सकाळी ७ वाजता मशिदीत बकरी ईदची नमाज होणार आहे, तर २९ मे रोजी शुक्रवारची नमाज पार पडणार आहे. या संस्थेमध्ये सध्या दोन गट निर्माण झाले असून, मशिदीच्या परिसरात तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने सतर्क राहणे गरजेचे असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

हेही वाचा