स्विमिंग पूलमध्ये बुडून पुण्यातील पर्यटकाचा मृत्यू

केळशी येथील रिसॉर्टच्या स्विमिंग पूलमध्ये घटना

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
स्विमिंग पूलमध्ये बुडून पुण्यातील पर्यटकाचा मृत्यू

मडगाव : दक्षिण गोव्यातील मोबर- केळशी येथील एका रिसॉर्टच्या स्विमिंग पूलमध्ये पोहताना पुण्यातील ४१ वर्षीय पर्यटकाचा मृत्यू झाला. योगेश सोनावणे (४१ वर्षे, रा. चिंचवडे नगर, पुणे) असे मृताचे नाव आहे.

योगेश सोनावणे हे त्यांच्या मित्रांसोबत पर्यटनासाठी गोव्यात आले होते. २५ मे रोजी मोबर केळशी येथील द बायके हेरिटेज ओल्ड अँकर या रिसॉर्टच्या स्विमिंग पूलमध्ये पोहत असताना ते पाण्यात बुडाले. त्यांचे मित्र महेश पवार यांनी तत्काळ या घटनेची माहिती कोलवा पोलिसांना दिली. सोनावणे यांना तातडीने बाळ्ळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आले, मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच कोलवा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.

मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात शवचिकित्सा करण्यात आली. शवचिकित्सा अहवालानुसार, पाण्यात बुडाल्यामुळे श्वास गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचे कारण समोर आले. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात दिला. कोलवा पोलीस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कोलवा पोलीस उपनिरीक्षक मंजू वांतामुरी या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.