सरकारी प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना होणार लाभ

पणजी : गोवा मुख्यमंत्री शिक्षण सुविधा योजनेअंतर्गत राज्यातील सरकारी प्राथमिक शाळांमधील पहिली आणि तिसरीच्या विद्यार्थ्यांना गणवेश (uniform) आणि रेनकोटसाठी (raincoat) १,१०० रुपयांची मदत करण्यात येणार आहे. राज्यातील ८,२०० विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. यामध्ये रेनकोटसाठी ५०० रुपये आणि गणवेशासाठी ६०० रुपये असे एकूण १,१०० रुपये थेट विद्यार्थ्यांच्या खात्यांत जमा केले जाणार आहे. निधीचे वितरण १५ जुलैपर्यंत पूर्ण करण्याची सूचना शिक्षण खात्याने (education department of Goa) सहाय्यक जिल्हा शिक्षण निरीक्षकांना (एडीईआय) केली आहे.
खात्याचे संचालक शैलेश झिंगडे यांनी काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, शिक्षण खात्याने गोवा मुख्यमंत्री शिक्षण सुविधा योजनेअंतर्गत आधार आधारित पेमेंट सिस्टमद्वारे (एबीपीएस) आर्थिक सहाय्य वितरणाची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे पात्र लाभार्थ्यांना पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही मदत थेट लाभ हस्तांतरित होईल. सरकारने सर्व १२ तालुक्यांच्या सहाय्यक जिल्हा शिक्षण निरीक्षकांच्या एचडीएफसी बँक खात्यांमध्ये पात्र विद्यार्थ्यांच्या खात्यात पुढील हस्तांतरणासाठी ९० लाख २० हजार रुपये वितरित केले आहेत.
शासकीय प्राथमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या इयत्ता पहिली आणि तिसरीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला रेनकोट खरेदीसाठी ५०० रुपये, तर शालेय गणवेश खरेदीसाठी ६०० रुपये दिले जातील. सर्व एडीईआय आणि शासकीय प्राथमिक शाळांच्या प्रमुखांनी निधीच्या पडताळणी आणि वितरणाची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी. ही प्रक्रिया १५ जुलै २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी पूर्ण होईल याची खात्री करणे आवश्यक आहे. पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांनी संबंधित शाळांशी समन्वय साधावा. पालकांनी योजनेअंतर्गत लाभांचे सुरळीत व तत्काळ हस्तांतरण होण्यासाठी आधार-संलग्न बँक खात्याचा तपशील सादर केल्याची खात्री करावी.