वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती बेशिस्त वाहनचालकांच्या पथ्यावर

पणजी : मागील काही आठवडे राजधानी पणजीत वाहतूक कोंडी (traffic jam in Panjim) होत आहे. रस्त्यांवर चुकीच्या पद्धतीने करण्यात येणारे पार्किंग, वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती, लेन कटिंग यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली आहे. शहरातील दयानंद बांदोडकर रस्ता, मिरामार परिसर, १८ जून रस्ता, सांत इनेज परिसर, बाजार परिसर, कदंब बसस्थानक परिसर, मळा, भाटलेसह ताळगाव मध्येही वाहतूक कोंडी होत आहे. सुट्ट्यांमुळे शहरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. यामुळे देखील वाहतूक कोंडीत भर पडली आहे.
बाजार परिसर तसेच १८ जून रस्त्यावर अनेक व्यावसायिक आस्थापने आहेत. येथे नागरिकांची वर्दळ अधिक असते. या भागात पे पार्किंग असले तरी ते अपुरे पडत आहे. वाहने लावण्यास जागा नसल्याने रस्त्यावर डबल पार्किंग केले जात आहे. यामुळे आधीच लहान असलेले रस्ते आणखी अरुंद होऊन येथून वाहने चालवणे अवघड झाले आहे. बांदोडकर रस्त्यावर देखील असाच अनुभव येत आहे. सांत इनेज परिसरात शासकीय, खासगी कार्यालये अधिक आहेत. येथे सकाळी ११ ते १ तसेच सायंकाळी ५ ते ७ दरम्यान वाहतूक कोंडी होते.
भाटले, मळा परिसरातील रस्ते अरुंद आहेत. या भागात देखील रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्क केली जातात. यामुळे येथेही वाहतूक कोंडी होत आहे. सुट्टीच्या दिवशी मिरामार किनाऱ्याला भेट देणाऱ्या लोकांची संख्या अधिक असते. पार्किंगला जागा पुरेशी नसल्याने येथे सर्रास डबल पार्किंग केले जाते. विशेष करून रविवारी संध्याकाळी येथे रहदारीच्या समस्या निर्माण होत आहेत. शहरातील काही ठराविक भागात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांकडून चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या वाहनांवर पुरेशी कारवाई होत नसल्याने वाहतूक कोंडी वाढली आहे.
स्मार्ट बसमुळे वाहतुकीस अडथळा
शहरातील स्मार्ट सिटी ई बस या देखील वाहतूक कोंडीत भर घालत आहेत. या बस अनधिकृत बस थांबे घेत आहेत. प्रवाशांना घेणे तसेच सोडण्यासाठी या बस रस्त्यावर कुठेही थांबवण्यात येत आहेत. यामुळे देखील वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन बसच्या मागे वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसतात.
हॉटेल ग्राहकांमुळे कोंडी
सांत इनेज परिसरात मधुबन सर्कल ते काकुलो मॉल या रस्त्यावर अनेक हॉटेल सुरू झाली आहेत. या ठिकाणी रात्रीच्या वेळी ग्राहकांची गर्दी होते. येथे पुरेशी जागा नसल्याने रस्त्यावर कुठेही वाहने पार्क केली जात आहेत. यामुळे रात्री या परिसरात वाहतूक कोंडी होत आहे.