शेअर बाजारात मोठा परतावा देण्याच्या आमिषाने एकाला २ कोटींचा गंडा

सायबर विभागाकडून मुंबईतील नालासोपारातून एक संशयित जाळ्यात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
26th May, 11:48 pm
शेअर बाजारात मोठा परतावा देण्याच्या आमिषाने एकाला २ कोटींचा गंडा

म्हापसा : मडगाव येथील एका ४६ वर्षीय नागरिकाला शेअर बाजारात गुंतवणूक करून मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल २ कोटी ९ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी सायबर गुन्हे विभागाने महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने मयूर वाघे (वय २५, रा. नालासोपारा, ठाणे) या संशयिताला अटक केली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

हा फसवणुकीचा प्रकार फेब्रुवारी ते ८ मे २०२६ या काळात घडला. अज्ञात पाच संशयित आरोपींनी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून फिर्यादीशी संगनमताने संपर्क साधला. आपण ‘एंजल वन’ या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचे प्रतिनिधी असल्याचे भासवून त्यांनी नागरिकाला ‘ट्रेंडलॅटिक’ हे अॅप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले. शेअर बाजारात प्रचंड नफा मिळवून देण्याचे आश्वासन देऊन त्यांनी फिर्यादीला तब्बल २ कोटी ९ लाख ७८ हजार ६१२ रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले.

गुंतवलेली रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता, विविध कारणे सांगून संशयितांनी फिर्यादीकडे अतिरिक्त शुल्काची मागणी केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर गुन्हे विभागात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी सखोल तांत्रिक तपास करून महाराष्ट्रातील ठाणे येथे संशयिताचा ठावठिकाणा शोधून काढला. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने संशयित आरोपी मयूर वाघे याला शिताफीने पकडून अटक करण्यात आली.

पोलीस अधीक्षक राजू राऊत देसाई आणि सहायक अधीक्षक बी. व्ही. श्रीदेवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शेर्विन दाकॉस्ता, कॉन्स्टेबल यश कोले व सताराम नर्से यांच्या पथकाने ही कामगिरी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनुष्का पै बीर या करत आहेत.

आंतरराज्य सायबर टोळीशी संबंध उघड

संशयित आरोपीच्या बँक खात्यामध्ये या फसवणुकीतील २६ लाख रुपये रक्कम जमा झाली होती. ही रक्कम त्याने नंतर त्याच्या साथीदारांच्या विविध खात्यांमध्ये हस्तांतरित केली होती. पोलीस चौकशीत हे बँक खाते कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या राज्यांमधील सायबर फसवणुकीच्या इतर १२ प्रकरणांशी जोडले असल्याचे उघडकीस आले असून, त्या सर्व प्रकरणांतील फसवणुकीची एकूण रक्कम २.१० कोटी रुपये आहे.