मडगावात रेल्वे स्थानकातील प्रकार

मडगाव : येथील रेल्वे स्थानकावर परप्रांतीय कामगारांतील वादावेळी उपस्थित पोलीस कर्मचाऱ्याला दुसऱ्या ऑफ ड्युटी पोलीस कर्मचाऱ्याने कारवाईपासून रोखले व कॉलरलाही हात घातला. या प्रकारानंतर पोलिसांतील वाद व हाणामारी हाच विषय उपस्थितांतून चर्चिला जात होता.
मडगाव रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक सहावर काही परप्रांतीय कामगारांमध्ये वाद होऊन मारामारी सुरू होती. याचा त्रास उपस्थित प्रवाशांना होत होता. त्यावेळी एका प्रवाशाने कोकण रेल्वे पोलिसांना कॉल करत कामगारांमध्ये भांडण सुरू असल्याची माहिती दिली. त्यानुसार, पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी भांडण करत असलेल्या कामगारांना समजावण्याचा प्रयत्न केला. पोलीस कर्मचारी ही कारवाई करत असतानाच एक व्यक्ती या कारवाईत अडथळा करू लागली. चौकशी केल्यानंतर सदर व्यक्ती ही कोकण रेल्वे पोलीस स्थानकातच कार्यरत असून सध्या ऑफ ड्युटी होती. या मद्यधुंद पोलिसाने परप्रांतीय कामगारांवर कारवाई करत असलेल्या पोलिसाशी वाद घातला. त्यानंतर त्याने ऑन ड्युटी पोलीस कर्मचाऱ्यांच्या कॉलरलाही हात घातला. अचानक परप्रांतीय कामगारांच्या मारामारीचा मुद्दा बाजूला राहिला. ऑन ड्युटी पोलीस कर्मचाऱ्याची त्याच पोलीस स्थानकातील दुसऱ्या ऑफ ड्युटी कर्मचाऱ्याने कॉलर पकडली हीच घटना सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली. पोलीस कर्मचारीच एकमेकांवर हात उचलू लागल्यास सामान्य जनतेच्या सुरक्षिततेचे काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
दरम्यान, याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, या प्रकाराची दखल घेण्यात आली असून सदर पोलीस कर्मचारी ऑफ ड्युटी होता असे सांगण्यात आले. तसेच या प्रकाराबाबत वरिष्ठांना कळविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.