कोलवा पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात; चौकशी सुरू.

मडगाव : केळशी परिसरातील मोबोर समुद्रकिनाऱ्यावर २७ वर्षीय शशी लाक्रा या तरुणाची धारदार शस्त्राने हत्या झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी कोलवा पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. संजय मांझी (वय ३० वर्षे, रा. रायगड-छत्तीसगड), आशिष कुमार (वय १८ वर्षे, रा. जशपूर-छत्तीसगड) आणि जगंनंदन सिदार (वय २२ वर्षे, मूळ छत्तीसगड, सध्या रा. बेतुल) अशी संशयितांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मोबोर समुद्रकिनाऱ्या जवळील 'द बायके हेरिटेज ओल्ड अँकर रिसॉर्ट'च्या परिसरात एका तरुणाचा खून झाल्याची माहिती कोलवा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तिथे पोलिसांना २७ वर्षीय शशी लाक्रा याचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (पोस्टमार्टेम) मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात पाठवला आहे. संशयितांनी लाक्रा याच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला होता. त्याच्या मानेवर झालेल्या खोल जखमेमुळे त्याचा मृत्यू झाला.या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला असून, मोबोर-केळशी परिसरातच राहणाऱ्या तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. या हत्येमागील नेमके कारण काय होते, याचा शोध सध्या पोलीस घेत असून पुढील तपास सुरू आहे.