ड्रग्ज तस्करीप्रकरणी साळगाव येथील युवकाला अटक

एएनसीची कारवाई : कळंगुट येथे ६.५९ ग्रॅम एक्टसी टॅब्लेट्स जप्त

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
22nd May, 11:17 pm
ड्रग्ज तस्करीप्रकरणी साळगाव येथील युवकाला अटक

पणजी : गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) कळंगुट येथे छापा टाकून ६५ हजार ९०० रुपये किमतीचा ६.५९ ग्रॅम एक्टसी टॅब्लेट्स जप्त केल्या. या प्रकरणी एएनसीने ड्रग्ज तस्कर वैभव गावडे (२३, साळगाव) याला अटक केली. त्याला म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी ठोठावली.

अमली पदार्थ विरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार, जामिनावर सुटका झालेला साळगाव येथील ड्रग्ज तस्कर वैभव गावडे पुन्हा सक्रिय झाला आहे. तसेच तो मोठ्या प्रमाणात ड्रग्ज तस्करी करीत असल्याची माहिती गुप्तहेरांकडून एएनसीच्या एका अधिकाऱ्याला मिळाली होती. त्यानुसार, मागील अनेक दिवस एएनसीचे पथक त्याच्या मागावर होते. याच दरम्यान संशयित वैभव गावडे कळंगुट परिसरात ड्रग्ज तस्करीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. याची दखल घेऊन पोलीस अधीक्षक सुनीता सावंत आणि सिद्धांत शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सगुण सावंत यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक विकेश हडफडकर व इतर पथकाने २२ रोजी मध्यरात्री १.१० ते पहाटे ४.२० दरम्यान कळंगुट क्रिकेट मैदानाजवळ बस पार्किंग परिसरात सापळा रचला. त्यावेळी संशयित वैभव गावडे (२३, साळगाव) त्या ठिकाणी दुचाकी घेऊन आला. त्याला पथकाने ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडून ६५ हजार ९०० रुपये किमतीचा ६.५९ ग्रॅम एक्टसी टॅब्लेट्स जप्त केल्या. तसेच त्याचा मोबाईल आणि दुचाकी ताब्यात घेतली.

पोलीस उपनिरीक्षक विकेश हडफडकर यांनी संशयिताविरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याचे कलम २२(बी) अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. त्यानंतर शुक्रवारी त्याला म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्याला चार दिवस पोलीस कोठडी ठोठावली.

ड्रग्ज तस्करीप्रकरणी यापूर्वीही अटक

ड्रग्ज तस्कर वैभव गावडे याला यापूर्वी गुन्हा शाखेने १६ एप्रिल २०२६ रोजी अटक केली होती. त्यावेळी त्याच्याकडून ९० हजार रुपये किमतीचे ६.०४ ग्रॅम एमडीएमए आणि १.२ ग्रॅम एक्टसी जप्त केल्या होता. त्यानंतर त्याला ६ मे रोजी न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता.