चिकणे-कुडणेतील महिलेचा खुनी अद्याप फरारच

पोलिसांकडून शोध सुरू : तोंडावर जोरदार प्रहार केल्याने मृत्यू

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
20th May, 09:27 pm
चिकणे-कुडणेतील महिलेचा खुनी अद्याप फरारच

साखळी : चिकणे-कुडणे, साखळी येथील शैला संजय घाडी यांचा त्यांच्या राहत्या घरात जबर मारहाण करून खून केल्यानंतर फरार झालेला संशयित सागर राऊळ अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. डिचोली पोलिसांकडून त्याचा कसून शोध सुरू असून, दोन विशेष पथके गोव्याबाहेर पाठवण्यात आली आहेत. संशयिताला लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

शैला संजय घाडी यांना त्यांच्याच घरात दुपारी २.३० वा. च्या सुमारास सागर राऊळ याने जबर मारहाण केली होती. तसेच तिचे डोके भिंतीला आपटले होते. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला होता. या कृत्यानंतर सागर राऊळ याने घटनास्थळावरून महिलेचा मोबाईल व सोनसाखळी घेऊन पळ काढला होता.

पळत असताना शैला यांच्याच मोबाईलवरून त्याने तिच्या मुलींना आपण तुमच्या आईला मारल्याचे सांगितले होते. तसेच त्यांनाही मारण्याची धमकी दिली होती. ही घटना समजल्यानंतर डिचोली पोलीस उपअधीक्षक श्रीदेवी बि. व्ही., पोलीस निरीक्षक विजय राणे, उपनिरीक्षक आकाश परवार, महिला उपनिरीक्षक अर्चना शर्मा यांनी व इतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शैला यांचा मृतदेह मुख्य दरवाजाजवळच होता.

पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला. यावेळी मोबाईल फॉरेन्सिक पथक, श्वानपथक उपस्थित होते. या तपासात पोलिसांनी विविध माध्यमांचा वापर करुन फरार असलेल्या संशयित सागर राऊळ याच्या मागावर पोलीस पथके पाठवली होती. या पथकांकडून फरार सागर राऊळ याची माहिती मिळवून त्याप्रमाणे त्याला ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना अद्यापतरी यश आले नव्हते. परंतु लवकरच सागर याला पोलीस ताब्यात घेतील असा विश्वास पोलीस सूत्रांकडू् व्यक्त करण्यात येत आहे.

तोंडावर जोरदार प्रहार केल्याने मृत्यू

घरात अन्य कोणीही नसताना सागर याने शैला यांच्या घरात प्रवेश करून तिच्याशी वाद व भांडण केले. या भांडणात या दोघांमध्ये झालेल्या झटापटीत घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडले होते. भांडणावेळी सागर याने शैला यांच्या तोंडावर प्रहार केल्याने तिला जखम झाली. यातच शैला यांचा मृत्यू झाल्याचे शवचिकित्सा अहवालात नमूद करण्यात आले आहे. 


हेही वाचा