दोनापावला सर्कलजवळ अपघात : आरोपी चालक पोलिसांच्या ताब्यात

पणजी : दोनापावला सर्कलजवळ मंगळवारी मध्यरात्री एका भरधाव आलिशान ‘बीएमडब्ल्यू एम ३४० आय’ कारने रस्त्यावरील तीन वाहनांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. याप्रकरणी पणजी पोलिसांनी कार चालक जगदीश सरदेसाई (वय २७, रा. दोनापावला) याला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
नियंत्रण कक्षाकडून अपघाताची माहिती मिळताच पणजी पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बाबू मदनवर व त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून अपघातग्रस्त वाहने बाजूला सारली आणि रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.
मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे ड्रायव्हिंग
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. चालक जगदीश सरदेसाई हा मद्यधुंद अवस्थेत अतिवेगाने आणि बेदरकारपणे कार चालवत होता. अपघात घडल्यानंतर शुद्धीवर नसलेल्या या चालकाने इतर कार चालकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत घटनास्थळी मोठा गोंधळ घातला. यामुळे दोनापावला परिसरात काही काळ तीव्र तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
सीसीटीव्ही फुटेज आले समोर
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी केली असता, बीएमडब्ल्यू कारचा अतिवेग स्पष्टपणे दिसून आला. अपघातस्थळी पोहोचताच चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि त्याने प्रथम रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या महिंद्रा ईव्ही आणि स्कोडा रॅपिड या दोन कारना धडक दिली. त्यानंतर समोरून येणाऱ्या महिंद्रा थारला धडक देऊन ही कार थांबली. या अपघातात चारही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
दोन महिन्यांतील दुसरी मोठी घटना
दोनापावला परिसरात आलिशान गाड्यांच्या बेदरकार वेगामुळे अपघातांचे सत्र वाढल्याने स्थानिक नागरिकांमधून आता तीव्र चिंता व्यक्त होत आहे. गेल्या दोन महिन्यांत या भागात घडलेली ही दुसरी मोठी दुर्घटना आहे.
५ एप्रिलच्या ‘मिनी कूपर’ अपघाताची पुनरावृत्ती
यापूर्वी रविवार, ५ एप्रिल रोजी रात्री दोनापावला येथील मणिपाल रुग्णालयाजवळ अशाच एका अतिवेगवान ‘मिनी कूपर’ या आलिशान कारने मोटारसायकलला जोरदार धडक दिली होती. त्या भीषण अपघातात मोटरसायकलवरील दीक्षा पारवाडकर (वय २३, रा. कर्नाटक) या तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता, तर डी. अरुण (रा. मडगाव, मूळ चेन्नई) हा गंभीर जखमी झाला होता. त्या प्रकरणी पोलिसांनी कार चालक डॅरियस डायस (वय २२, रा. बोगमाळो-वास्को) याला अटक केली होती. ही घटना ताजी असतानाच आता बीएमडब्ल्यू कारचा हा थरार समोर आला आहे.
पीडित जोडप्याची आपबिती
आम्ही रस्त्याच्या कडेला थांबलो असताना संशयित चालक प्रचंड वेगाने आला. त्याने हुज्जत घालत आमच्या गाडीची तोडफोड केली, असे पीडित तरुणीने सांगितले. तिच्या पतीने पुढे म्हटले, आम्ही यू-टर्न घेत असताना त्याने गाडी आडवी आणली. मला गाडी बाजूला घेण्यास सांगत त्याने माझ्या तोंडावर बुक्के मारले. मला वाचवताना माझी पत्नीही जखमी झाली. या जीवघेण्या हल्ल्यातून आम्ही सुदैवाने वाचलो असून पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.