विशेष निधीचे वाटप : एनडीआरएफसह तटरक्षक दलाच्या तुकड्या तैनात

पणजी : मान्सून काळात आपत्ती व्यवस्थापनासाठी राज्य सरकारची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे. मान्सूनपूर्व कामांसह अतिरिक्त रुग्णवाहिका, चोवीस तास उपलब्ध असणारी कंट्रोल रूम, एनडीआरएफची तुकडी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना विशेष निधी अशा विविध उपायोजना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
आपत्ती व्यवस्थापनासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांना ५ लाख रुपये, पंचायतींना ३५ हजार रुपये, नगरपालिकांना ६० ते ७० हजार रुपये, तर पणजी महापालिकेला १.२० लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. याशिवाय उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाला ४ कोटी, दक्षिण गोव्याला ३ कोटी तर कुशावती जिल्ह्यासाठी २ कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. गरज पडल्यास जिल्हाधिकारी कार्यालयांना अतिरिक्त निधीची मागणी करता येईल. तसेच, अपघातांची शक्यता गृहीत धरून राष्ट्रीय महामार्गावर ४ अत्याधुनिक रुग्णवाहिका ठेवण्यात आल्या आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
मान्सून काळात आपत्कालीन परिस्थितीत सरकार भारतीय नौदलाच्या १० पाणबुड्यांची मदत घेणार असून, या पाणबुड्यांचा ५० लाख रुपयांचा विमा उतरवण्यात आला आहे. अरुंद रस्त्यांसाठी ९६ लाख रुपये खर्चून लहान अग्निशामक बंब खरेदी करण्यात आला आहे. सरकारने १७२ जणांना आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले असून, प्रशिक्षित आपदा मित्र आणि सखींना प्रती दिन ७५० रुपये भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे.
तालुकास्तरावर चोवीस तास उपलब्ध असणारी कंट्रोल रूम सुरू करण्यात आली असून, यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक लवकरच जाहीर केले जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मान्सूनच्या चार महिन्यांच्या काळासाठी एनडीआरएफची एक तुकडी गोव्यात तैनात केली जाणार आहे. तटरक्षक दलातर्फे ‘सागर कवच’ अंतर्गत गोव्याच्या किनाऱ्यांवर दोन बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. अग्निशामक दल व अन्य आपत्कालीन सेवा पोहोचण्याचा कालावधी ६ मिनिटांपर्यंत कमी करण्याचे आमचे ध्येय आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची लवकरच पुनर्रचना करण्यात येणार आहे. यानुसार हे प्राधिकरण मान्सूनच्या चार महिन्यांशिवाय अन्य महिन्यांतही केवळ आपत्ती व्यवस्थापनाचेच काम करेल. यासाठी महसूल, अग्निशामक दल आणि पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.