मोरजी समुद्रात बुडालेल्या रुपेश आजगावकर यांचा मृतदेह सापडला

समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले असता घडली दुर्घटना

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
18th May, 08:54 pm
मोरजी समुद्रात बुडालेल्या रुपेश आजगावकर यांचा मृतदेह सापडला

डिचोली : मोरजी येथील समुद्रात स्नान करण्यासाठी गेलेले आणि बेपत्ता झालेले नानोडा-डिचोली येथील रुपेश प्रभाकर आजगावकर (वय ४५) यांचा मृतदेह सोमवारी दुपारी कामुर्ली-शापोरा नदीत सापडला. मित्रांसोबत आणि कुटुंबीयांसमवेत समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले असता ही दुर्दैवी घटना घडली.

समुद्रात स्नान करताना बेपत्ता

मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे तीस जणांचा एक गट मोरजी-पेडणे येथील समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेला होता. या गटात रुपेश आजगावकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचाही समावेश होता. दुपारचे जेवण झाल्यानंतर रुपेश हे समुद्रात स्नान करण्यासाठी गेले असता ते अचानक बेपत्ता झाले.

उशिरापर्यंत सुरू होती शोधमोहीम

गटातील सदस्यांनी मोरजी समुद्रकिनारी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती; मात्र त्यांचा काहीच मागमूस लागला नाही. अखेर त्यांच्या कुटुंबीयांनी मांद्रे पोलीस स्थानकात ते हरवल्याची तक्रार दाखल केली.

स्थानिकांची तत्परता

सोमवारी दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास कामुर्ली जलवाहतूक स्थानकाजवळील शापोरा नदीत एका व्यक्तीचा मृतदेह तरंगताना स्थानिकांना आढळला. स्थानिकांनी तत्काळ मृतदेह नदीबाहेर काढून ‘१०८’ रुग्णवाहिकेला पाचारण केले तसेच याबाबतची माहिती कोलवाळ पोलिसांना दिली.

नानोडा परिसरात हळहळ

कोलवाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत व्यक्तीची ओळख रुपेश आजगावकर अशी पटवली आणि याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना दिली. पुढील वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रियेसाठी मृतदेह म्हापसा जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. या निधनामुळे नानोडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

#GoaNews #MorjimBeach #ChaporaRiver #Bicholim #GoaIncident #BreakingNews #MissingPerson #GoaPolice