दोन वेळा आमदार होण्याची संधी थोडक्यात हुकली

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : डॉ. केतन भाटीकर हे फिजिओथेरपिस्ट असतानाच समाजकार्यही करत होते. सक्रिय राजकारणात पाऊल ठेवून आमदार, मंत्री होण्याचे त्यांचे स्वप्न होते. आमदार होण्याचे स्वप्न दोन वेळा हिरावून घेतल्यानंतर नियतीनेच त्यांचा घात केला. डॉ. भाटीकर यांनी कोविड काळात अनेकांना मदत केली. त्यामुळे २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत मगो पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. तिरंगी लढतीत सुरुवातीला भाजपचे रवी नाईक फक्त एका मताने विजयी झाले होते. मतांतील अंतर कमी असल्याने फेरमतमोजणी करण्यात आली. त्यात भाटीकर यांना ७७ मतांनी पराभव पत्करावा लागला. समीप जाऊनही विजय त्यांच्यापासून दूरच राहिला.
रवी नाईक यांच्या निधनानंतर फोंडा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली. मगो आणि भाजपची युुती असल्याने मगोने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाटीकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली. डॉ. भाटीकरांना मतदारांचा उत्तम प्रतिसाद मिळत होता. मात्र मतदानाच्या आदल्या दिवशी उच्च न्यायालयाने फोंडा पोटनिवडणूक रद्द करण्याचा आदेश दिला. त्यामुळे आमदार होण्याचे त्यांचे स्वप्न पुन्हा भंग पावले.
आता वर्षभराच्या आत विधानसभा निवडणूक होणार आहे. आतापासूनच त्यांनी त्या निवडणुकीची तयारी सुरू केली असताना अचानक सर्पदंशामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे त्यांचे आमदार, मंत्री होण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. नियती कोणाला राजयोग देईल आणि कोणाचा हिरावून घेईल, हे सांगता येत नाही हेच खरे.