स्वच्छता विभाग निरीक्षकाच्या बदलीची प्रक्रिया सुरू

प्रतिनिधी। गोवन वार्ता
फोंडा : प्राथमिक आरोग्य केंद्रात काही दिवसांपूर्वी अनेक संशयास्पद डेंग्यूचे रुग्ण आढळले होते. त्यानंतर आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता पार्सेकर यांची बदली करण्यात आली आहे. स्वच्छता विभागाचे निरीक्षक मनोज नाईक यांच्या बदलीची प्रक्रिया आरोग्य खात्याने सुरू केली आहे.
दत्तगड भागात दरवर्षी संशयास्पद डेंग्यू रुग्णांची नोंद होत असते. फोंडा आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता पार्सेकर, स्वच्छता निरीक्षक मनोज नाईक आणि कर्मचारी त्या भागात जागृती करत होते. पाण्याची समस्या गंभीर असल्याने लोक टँकरमधून पाणी खरेदी करून भांड्यात साठवून ठेवतात. भांडी झाकून ठेवत नसल्यामुळे संशयास्पद डेंग्यू रुग्ण मिळत आहेत. आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता पार्सेकर यांची मडकई प्राथमिक आरोग्य केंद्रात बदली करण्यात आली आहे. स्वच्छता निरीक्षक नाईक यांच्या बदलीची प्रक्रिया शनिवारपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
डॉ. स्मिता पार्सेकर, मनोज नाईक व कर्मचारी दत्तगड-बेतोडा परिसरात चांगले काम करत होते. त्यांचीच बदली झाल्यामुळे पुढील वर्षी संशयास्पद डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण डॉ. स्मिता पार्सेकर व मनोज नाईक यांना दत्तगड भागाची माहिती होती. रुग्ण आढळल्यानंतर ते तातडीने योग्य उपाय करत होते.
_ उच्चारी गावडे, ग्रामस्थ, बेतोडा