अपघाती मृत्यूंमध्ये दुचाकीचालक अधिक

एनसीआरबीचा अहवाल : २०२१ मध्ये १५१, २०२४ मध्ये २०९ दुचाकीस्वार गतप्राण


12th May, 11:44 pm
अपघाती मृत्यूंमध्ये दुचाकीचालक अधिक

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात रस्ते अपघातात मृत्यू होणाऱ्या दुचाकी चालकांची संख्या मागील काही वर्षांत वाढत आहे. २०२१ च्या तुलनेत २०२४ मध्ये रस्ते अपघातातील दुचाकी चालकांच्या मृत्यूंची संख्या ५.५ टक्क्यांनी वाढली आहे. चारचाकी चालकांच्या मृत्यूंची संख्या ३.६७ टक्क्यांनी, तर पादचाऱ्यांच्या मृत्यूंची संख्या ७.९८ टक्क्यांनी कमी झाली आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) ‘भारतातील अपघाती मृत्यू आणि आत्महत्या’ अहवालातून ही माहिती मिळाली आहे.
अहवालानुसार, राज्यात २०२१ मध्ये एकूण २,८५० रस्ते अपघातांची नोंद झाली होती. यामध्ये ८५६ जखमी झाले, तर २२६ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये १५१ दुचाकीचालक (६६.८१ टक्के) होते. २९ चारचाकी चालकांचा (१९.२० टक्के) व ३४ पादचाऱ्यांचा (२२.५१ टक्के) मृत्यू झाला होता. २०२४ मध्ये एकूण २,६८२ रस्ते अपघातांची नोंद झाली. यामध्ये १,०४७ जखमी, तर २८९ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये २०९ दुचाकीचालक (७२.३१ टक्के) होते. १६ चारचाकी चालकांचा (१५.४५ टक्के) व ४२ पादचाऱ्यांचा (१४.५३ टक्के) मृत्यू झाला होता.
राज्यात २०२१ ते २०२४ दरम्यान रस्ते अपघातात सायकलस्वार व ट्रक चालकांच्या मृत्यूचे प्रमाण तुलनेने कमी होते. वरील कालावधीत राज्यात १९ सायकलस्वारांचा मृत्यू झाला होता. यामध्ये २०२३ आणि २०२१ मधील प्रत्येकी ६ सायकलस्वारांचा समावेश आहे. चार वर्षांत राज्यात रस्ते अपघातात २२ ट्रक चालकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये २०२४ मध्ये सर्वाधिक ८ ट्रक चालकांचा मृत्यू झाला. वरील कालावधीत राज्यात ५ तीन चाकी चालक, तर ६ बस चालकांचा मृत्यू झाला. ९ मृत अन्य प्रकारची वाहने चालवत असल्याचे अहवालात म्हटले आहे.
रेल्वे अपघातात महिन्याला ४ मृत्यू
राज्यात २०२१ ते २०२४ या कालावधीत रेल्वे रुळांवर अथवा रेल्वे स्थानक परिसरात झालेल्या अपघातांत १८४ जणांचा मृत्यू झाला. याचाच अर्थ महिन्याला सरासरी ४ जणांचा मृत्यू झाला. २०२२ मध्ये सर्वधिक ५४ जणांचा मृत्यू झाला होता. राज्यात रेल्वे क्रॉसिंग अथवा रेल्वेची धडक होऊन कोणतेही अपघात आणि मृत्यू झालेले नाहीत, असे अहवालात म्हटले आहे.