एनसीआरबीचा अहवाल : पहाटे ३ ते सकाळी ६ दरम्यान सर्वांत कमी अपघात

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात सायंकाळी ६ ते रात्री ९ ही वेळ ‘घातवेळ’ ठरत आहे. २०२४ मध्ये झालेल्या एकूण रस्ते अपघातांपैकी सर्वाधिक १८ टक्के अपघात याच वेळेत झाले आहेत. असे असले तरी तीन वर्षांच्या कालावधीत या वेळेत होणाऱ्या अपघातांची संख्या कमी होत गेली आहे. २०२२ मध्ये एकूण रस्ते अपघातांपैकी २० टक्के, तर २०२३ मध्ये १९ टक्के अपघात हे वरील वेळेत झाले होते. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) ‘भारतातील अपघाती मृत्यू आणि आत्महत्या’ या अहवालांतून ही माहिती मिळाली आहे.
अहवालानुसार, राज्यात २०२४ मध्ये एकूण २,६८२ रस्ते अपघातांची नोंद झाली. यातील ४४२ (१७ टक्के) अपघात दुपारी ३ ते सायंकाळी ६ दरम्यान झाले होते. दुपारी १२ ते ३ दरम्यान ४०६ (१५.१३ टक्के), सकाळी ९ ते दुपारी १२ दरम्यान ३७७ (१४.०५ टक्के), रात्री ९ ते मध्यरात्री १२ दरम्यान ३२६ (१२.२५ टक्के), पहाटे ६ ते सकाळी ९ दरम्यान २७५ (१०.२५ टक्के), मध्यरात्री १२ ते पहाटे ३ दरम्यान २२५ (८.३८ टक्के) अपघातांची नोंद झाली होती. सर्वात कमी १५१ रस्ते अपघात (५.६३ टक्के) हे पहाटे ३ ते सकाळी ६ दरम्यान झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
राज्यात २०२३ मधील एकूण रस्ते अपघातांपैकी ४८२ (१७ टक्के) अपघात दुपारी ३ ते सायंकाळी ६ दरम्यान झाले होते. दुपारी १२ ते ३ दरम्यान ४२८ (१५ टक्के), सकाळी ९ ते दुपारी १२ दरम्यान ४२६ (१४.९६ टक्के), रात्री ९ ते मध्यरात्री १२ दरम्यान ३४९ (१२.२५ टक्के), सकाळी ६ ते ९ दरम्यान २५५ (८.६३ टक्के), मध्यरात्री १२ ते पहाटे ३ दरम्यान २१३ (७.४८ तक्के) अपघातांची नोंद झाली होती. सर्वात कमी १५२ रस्ते अपघात (५.३३ टक्के) हे पहाटे ३ ते सकाळी ६ दरम्यान झाले झाले होते.
दुपारी १२ ते ३ दरम्यान १५.६३ टक्के अपघात
२०२२ मध्ये १५.६३ टक्के अपघात हे दुपारी १२ ते ३ दरम्यान झाले होते. दुपारी ३ ते संध्याकाळी ६ दरम्यान १५.१७ टक्के, सकाळी ९ ते दुपारी १२ दरम्यान १३.०४ टक्के, मध्यरात्री १२ ते पहाटे ३ दरम्यान ९.४९ टक्के, सकाळी ६ ते ९ दरम्यान ८.६३ टक्के, तर ५.०४ टक्के हे पहाटे ३ ते सकाळी ६ दरम्यान झाले होते.