वीरेश बोरकर नॉट रिचेबल : मनोज परब यांनी पदाधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाचा (आरजीपी) अंतर्गत वाद सोशल मीडियावर गाजू लागला आहे. पक्षाचे सर्वेसर्वा मनोज परब यांनी सोशल मीडियावर पक्षातील काही पदाधिकाऱ्यांवर बोचरी टीका केली आहे. यातील बरेच पदाधिकारी सांत आन्द्रेचे आमदार वीरेश बोरकर यांच्या जवळचे आहेत. परब यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमधून आरजीपीत फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. मनोज गटाचे समर्थक बोरकर गटाच्या समर्थकांकडून स्पष्टीकरण मागत आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून आरजी पक्षात अंतर्गत वाद सुरू आहे. आरजीपीचे आगशीचे पंच ज्युलियस आल्मेदा यांना पक्षाच्या कोअर कमिटीने पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवून पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला होता. कोअर कमिटीच्या या निर्णयामुळे आरजीपीचे आमदार वीरेश बोरकर निराश होते. हा वाद महिनाभर आतल्याआत शिजत होता. वीरेश बोरकर यांनी पक्षात सर्व काही चांगले असल्याचे सांगून त्यावर पडदा टाकला होता.
मंगळवारी सकाळी मनोज परब यांनी सोशल मीडियावर पक्षातील पदाधिकाऱ्यांविषयी पोस्ट टाकणे चालू केले. आरजीपीचे उत्तर गोवा सरचिटणीस आणि सांत आन्द्रेचे आमदार वीरेश बोरकर यांचे सहकारी लिसियो रोन्कोन यांच्यावर मनोज परब यांनी सोशल मीडियावर टीका केली. सासष्टीतील डॅगली फर्नांडिस आणि बार्देशचे मायकल क्वेरोज यांनाही त्यांनी पोस्टमधून आव्हान देणे सुरू केले.
काय म्हणाले मनोज पोस्टमध्ये ?
‘धर्माच्या आधारावर हे तिघेही ब्रेनवॉश करतात’, असा आरोप परब यांनी केला. ‘अध्यक्षपद हवे होते, पक्ष हवा होता तर मला सांगायचे होते; असाच काढून दिला असता’, ‘जीवन दिले पक्षासाठी, पद कसले ?’ ‘मनोजने असे रहायला हवे, तसे बोलायला हवे, हे करायला हवे, ते नको. मुलगी देता काय मला तुमची? वडिलांना मुले जन्माला घालायला शिकवायचे नसते... लक्षात ठेवा’, अशा कठोर शब्दांत मनोज यांनी आपल्याच पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.
आल्मेदांना काढल्यापासून पक्षात दोन गट
आल्मेदा यांना काढल्यावर आरजीत वाद उफाळून येऊन दोन गट झाले आहेत. एक गट मनोज परब यांचे समर्थन करतो, तर दुसरा आमदार वीरेश बोरकर यांचे समर्थन करतो. फेसबुकवर मनोजने वीरेश बोरकर यांच्या समर्थकांना लक्ष्य केले आहे. मनोजला त्यांच्या समर्थकांचा पाठिंबा मिळत आहे. बोरकर यांचे समर्थक आमचे ब्रेनवॉश करतात, असाही आरोप मनोज समर्थकांनी फेसबुवकर केला आहे. लिसियो यांनी आरजीपीचे सर्व इमेल एका मीडिया चॅनलला लीक केले आहेत. वीरेश बोरकर यांनी याविषयी स्पष्टीकरण द्यावे, असे आव्हान मनोज यांच्या जवळचे विश्वेश नाईक यांनी दिले आहे.
वीरेशबाबत काँग्रेसकडून प्रतिक्रिया नाही
आरजीचे आमदार वीरेश बोरकर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का, या प्रश्नावर प्रतिक्रिया देण्यास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर व खासदार विरियातो फर्नांडिस यांनी नकार दिला आहे.
आरजीपीचे खजिनदार अजय खोलकर म्हणाले...
कोणी आले-गेले तरी पक्ष बंद पडत नाही. काही दिवसांपासून पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांना लक्ष्य करून त्यांच्यावर निराधार आरोप केले जात आहेत. आरोप करून पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या पक्षातील सदस्यांची नावे आम्हाला समजली असून त्यावर मनोज परब यांनी भाष्य केले आहे. अशा लोकांना पक्षात राहण्याचा कोणताही अधिकार नाही. पक्षाच्या कोअर समितीने यासंदर्भात निर्णय घेतला आहे.
ज्युलियस आल्मेदा हे पक्षाचे सदस्य नसले तरी ते आमच्या आमदारांसोबत राहून पक्षविरोधी कारवाया करत आहेत. आम्ही नोटीस जारी करून ज्युलियस आमचे सदस्य नाहीत, हे स्पष्ट केले होते. तसेच जो कोणी त्यांच्यासोबत काम करेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला होता. स्पष्ट निर्देश देऊनही भाटी पंचायत पोटनिवडणुकीत ते आरजीपी कार्यकर्त्यांसोबत दिसून आले. त्यामुळे आदेशाचे पालन न केल्याने अध्यक्ष मनोज परब यांनी त्यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली.
मडगावातील बैठकीत झाले होते मनोजना हटवण्याचे नियोजन
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार वीरेश बोरकर यांच्या गटातील सदस्यांची मडगाव येथे काही दिवसांपूर्वी बैठक झाली होती. पक्षाचे सदस्य आदित्य देसाई यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत पक्षाला नवे नेतृत्व देण्याबाबत चर्चा झाली. पक्षाचा विषय न्यायालयात नेऊन आरजीच्या अध्यक्षपदावरून मनोज परब यांना हटविण्याचे नियोजन देसाई यांनी केले होते. देसाई यांना यापूर्वी पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवून केंद्रीय निवडणूक समितीतून काढून टाकण्यात आले होते. सध्या ते मूळ सदस्य म्हणून पक्षात आहेत. 
वीरेश बोरकरांनी फोन उचलला नाही
मनोज हे संतापून आपल्या मनातील सर्व भावना सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत. मनोज तत्काळ प्रतिक्रिया देत आहेत. मात्र आमदार वीरेश बोरकर यांची कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही. बोरकर यांच्याशी संपर्क साधण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र त्यांनी फोन उचलले नाहीत. पत्रकारांचे फोन घेत नसल्याबद्दल मनोज परब यांनी दिलगिरी व्यक्त करून यासंदर्भात लवकरच पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण देणार असल्याचे सांगितले.