सोन्याच्या दरात ८ ते १० हजार रुपयांनी वाढ : किलो चांदी ११ ते १३ हजार रुपयांनी महागली

पणजी : केंद्र सरकारने बुधवारपासून सोने, चांदीवरील (gold, silver) आयात शुल्कात (Import Duty) वाढ केली आहे. आयात शुल्क ६ टक्क्यांवरून १५ टक्के करण्यात आले आहे. या निर्णयानंतर अवघ्या काही तासांत देशासह राज्यभरातील (Goa) सोने, चांदीच्या दरात मोठी वाढ झाली. एक तोळा सोन्याच्या दरात कॅरेटनुसार ८ ते १० हजार रुपयांनी वाढ झाली, तर एक किलो चांदीचे दर ११ ते १३ हजार रुपयांनी वाढले. दरवाढीमुळे गुंतवणूक म्हणून सोने, चांदी खरेदी करणे कमी होण्याची शक्यता असली, तरी लग्न व अन्य सणांसाठी खरेदी कायम राहील, असा विश्वास काही स्थानिक सराफांनी व्यक्त केला आहे. काहींनी सोन्याच्या विक्रीबाबत चिंता व्यक्त केली आहे.
याबाबत गोवा ज्वेलर्स असोसिएशनचे समीर कुडतरकर यांनी सांगितले की, आयात शुल्क वाढविल्याने राज्यातील सोने, चांदीचे दर अचानक वाढले आहेत. असे असले तरी अद्याप जीएसटी दर कायम आहे. गोव्यामध्ये प्रामुख्याने लग्न किंवा अन्य सणांसाठी सोने खरेदी केली जाते. अशा समारंभात सोने खरेदी ही गरज बनली आहे. सोने खरेदी जणू प्रथा झाली आहे. दरवाढ झाली तरी गोमंतकीय व्यक्ती लग्नासाठी सोने नक्कीच खरेदी करेल. मात्र भविष्यातयामुळे गुंतवणूक म्हणून सोन्याचे बिस्कीट अथवा बुलियन पद्धतीचे सोने खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी होऊ शकते.
कुडतरकर म्हणाले की, काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोने खरेदी न करण्याचे आवाहन केले होते. मात्र गोव्यात या आवाहनाला कमी प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. सोने खरेदी कमी झाली, तर या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कारागिरांचाही विचार झाला पाहिजे. त्यांना पर्यायी उपजीविकेचे साधन कोणते आहे, हे स्पष्ट झाले पाहिजे. या व्यवसायात स्थानिक सराफांनी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे आमचाही विचार करावा. गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करण्यापेक्षा आवश्यक असेल तेव्हाच सोने खरेदी करावे, असे आवाहन आम्ही करतो.
अन्य एका सराफाने सांगितले की, दरवाढ झाल्याने ग्राहकांची संख्या कमी होऊन व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता आहे. गोव्यात लग्नांमध्ये किमान १० तोळे सोने खरेदी केली जाते. दरवाढीमुळे याचे प्रमाण कमी होऊ शकते. राज्यात गुंतवणूक म्हणून सोने खरेदी कमी होऊ शकते. काही ग्राहक जुने सोने देऊन त्या बदल्यात नवीन सोने घेतात. यामध्ये सोने आयात करण्याची गरज नाही नसते. त्यामुळे या पद्धतीमध्ये करात सूट देण्याचा विचार सरकारने केला पाहिजे. सणासुदीच्या काळात सोने खरेदी वाढावी, यासाठी आम्ही विविध ऑफर देण्याचा विचार करणार आहोत.
मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार!
समीर कुडतरकर यांनी सांगितले की, आयात शुल्क वाढीनंतर खरेदीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणार आहोत. यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहोत. यामध्ये आमच्या समस्या मांडण्यात येतील. याच पद्धतीचे पत्रपंतप्रधान कार्यालयालाही देण्यात येणार आहे.