आत्महत्या टाळण्यासाठी प्रशासकीय उपाययोजना सुरू; एग्ना क्लिटस यांची माहिती.

मडगाव : बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये गेल्या वर्षी चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर या वर्षी दुसऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे कॅम्पसमध्ये भीतीचे वातावरण असून, त्याचा गंभीर परिणाम संवेदनशील विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर होत आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी प्रशासन हे प्रकरण अत्यंत संवेदनशीलपणे हाताळणार आहे, अशी माहिती दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लिटस यांनी दिली.
जिल्हाधिकारी क्लिटस म्हणाल्या की, बिट्स पिलानीमधील मृत्यूच्या घटनांची जिल्हास्तरीय समिती, पोलीस आणि राष्ट्रीय स्तरावरील समितीने पाहणी केली आहे. फेब्रुवारी महिन्यात सरकारला सादर केलेल्या अहवालानुसार, आत्महत्या ही केवळ एका कारणाशी निगडीत नसते. शैक्षणिक ताण, कामगिरीबद्दलची चिंता, सामाजिक एकाकीपणा, झोपेच्या समस्या आणि वेळेवर मानसिक उपचार न मिळणे या गोष्टींचा त्यात समावेश असतो.
तपासणीदरम्यान कॅम्पसमध्ये तज्ज्ञ समुपदेशकांची कमतरता आढळली होती, मात्र त्यानंतर संस्थेने यात सुधारणा केली आहे. २४ तास कार्यरत असलेले समुपदेशन केंद्र आणि तज्ज्ञांची संख्या वाढवण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी परीक्षांची संख्या कमी करून पेपरांचे पर्यायही देण्यात आले होते. दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय आणि 'इन्स्टिट्यूट ऑफ सायकियाट्री अँड ह्युमन बिहेविअर' (IPHB) कडून मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्यात आली होती, तरीही आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही, हा चिंतेचा विषय आहे.
प्राथमिक तपासात आत्महत्या असल्याचे निदान
वेर्णा पोलिसांना बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येची माहिती मिळाली. हा विद्यार्थी कॅम्पसबाहेर भाड्याने राहत होता. प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचे दिसून आले असून, वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.