दिनेश गावडे मृत्यू प्रकरणी 'एससी/एसटी' आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

पणजी : गव्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या दिनेश गावडे यांच्या शवचिकित्सा अहवालाबाबत गोपनीयतेचा भंग झाल्याप्रकरणी गोवा अनुसूचित जाती/जमाती आयोगाने (एससी/एसटी) दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी केली आहे.
दिनेश गावडे यांचा मृत्यू ७ मे रोजी झाला होता. यानंतर, दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागप्रमुख आणि सहयोगी प्राध्यापक डॉ. मधू घोडकिरेकर यांनी १३ मे रोजी आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत, एसटी समाजातील एका व्यक्तीच्या शवविच्छेदन अहवालासंदर्भात फोंडा येथील उप-वनसंरक्षक कार्यालयाकडून गोपनीयतेचा भंग झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीची दखल घेत आयोगाने संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकरणाची योग्य चौकशी करून, त्यावर केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.