नीट युजी २०२६ परीक्षा रद्द झाल्याचा बसला धक्का

मडगाव : ‘नीट-युजी २०२६’ ची परीक्षा रद्द झाल्यानंतर निर्माण झालेल्या तणावातून नेसाय-कुडतरी येथे राहणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली. यापुढे मला पुन्हा स्पर्धा परीक्षेला बसायचे नाही, असे चिठ्ठीत लिहून या विद्यार्थ्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. हा विद्यार्थी मूळचा बंगळूर येथील असून मडगाव परिसरातील एका उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत होता.
मिळालेली माहिती अशी की, पेपरफुटीच्या प्रकरणानंतर 'नीट'ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय समजल्यानंतर, पुन्हा परीक्षेच्या चक्रात अडकण्याची इच्छा नसल्याने या विद्यार्थ्याने मंगळवारी टोकाचे पाऊल उचलले. घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली असून, त्यामध्ये त्याने स्पर्धा परीक्षांचा दबाव सहन होत नसल्याचे नमूद केले आहे.
मृत विद्यार्थ्याचे वडील रेल्वेमध्ये गार्ड म्हणून कार्यरत आहेत. घटनेच्या वेळी त्याची आई आणि बहीण मूळ गावी गेल्या होत्या. घरात कुणीही नसताना ही घटना घडली. वडील कामावरून घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मायना-कुडतरी पोलिसांनी या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.