व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

उन्हाळ्याच्या सुट्टीत पाण्याचा आनंद घेण्याचा मोह सर्वांनाच होतो, मात्र अनेकदा याच आनंदाचे रूपांतर भीषण अपघातात झाल्याच्या बातम्या आपण वाचतो. अशा घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण असते. मात्र, सध्या सोशल मीडियावर एका आईचा असा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिने आपल्या मुलाचा आनंदही जपला आहे आणि त्याच्या सुरक्षिततेचीही पूर्ण काळजी घेतली आहे. ही अनोखी शक्कल पाहून हजारो भावूक झाले आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा नदीच्या वाहत्या पाण्यात खेळताना दिसत आहे. नदीचा प्रवाह वेगवान असूनही हे मूल निर्भयपणे मस्ती करत आहे. याचे कारण म्हणजे नदीकाठी शांतपणे बसलेली त्याची आई. मुलाला पाण्यात खेळायची ओढ होती, पण त्याला कोणताही धोका होऊ नये म्हणून या माऊलीने त्याच्या कपड्यांना एका लांब दोरीचे टोक बांधले आणि दुसरे टोक आपल्या हातात घट्ट पकडून ठेवले. या साध्या पण प्रभावी कल्पनेमुळे मूल पाण्यात वाहून जाण्याची भीती उरली नाही.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. मुलाची इच्छाही पूर्ण केली आणि पालकाची जबाबदारीही पार पाडली, हे फक्त आईच करू शकते, अशा शब्दांत या आईचे कौतुक होत आहे. आजच्या काळात जिथे दुर्लक्षामुळे अनेक अपघात घडतात, तिथे या माऊलीने दाखवलेली समयसूचकता पालकांसाठी एक आदर्श उदाहरण ठरली आहे. धावपळीच्या आयुष्यात आईच्या निस्वार्थ प्रेमाचा आणि काळजीचा हा 'सुरक्षित' पदर सर्वांनाच भारावून टाकत आहे.