चार मंत्र्यांनीही घेतली शपथ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती

गुवाहाटी : आसाममध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकारची पुन्हा सत्ता स्थापन झाली असून; हिमंता बिस्वा सरमा यांनी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हिमंता बिस्वा सरमा यांच्यासोबत चार आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

गुवाहाटीतील खानापारा व्हेटरनरी कॉलेज मैदानावर भव्य शपथविधी सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh), भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन (Nitin Nabin) तसेच एनडीएचे विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते.

हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांच्यासोबत चार आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये भाजपचे रामेश्वर तेली आणि अजंता नेओग, मित्रपक्ष असोम गण परिषदेचे (AGP) अतुल बोरा आणि बोडोलँड पीपल्स फ्रंटचे (BPF) चरण बोरो यांचा समावेश आहे. तसेच ज्येष्ठ भाजप नेते आणि माजी मंत्री रंजीत कुमार दास यांना विधानसभा अध्यक्षपदासाठी एनडीएकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

शपथविधी सोहळ्यानंतर नव्या सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक होणार असून, निवडणुकीत दिलेली आश्वासने आणि विकासाचा अजेंडा राबविण्यास सरकार प्राधान्य देणार असल्याचे सरमा यांनी स्पष्ट केले.
आसाम विधानसभा निवडणुकीत एनडीएने विक्रमी यश मिळवत १२६ पैकी १०२ जागांवर विजय मिळवला. यामध्ये भाजपने एकहाती ८२ जागा जिंकत राज्यात प्रथमच स्पष्ट बहुमत मिळवले. तर एजीपी (AGP )आणि बीपीएफ (BPF) यांनी प्रत्येकी १० जागा मिळवल्या. विशेष म्हणजे, सलग तिसऱ्यांदा एनडीए सरकार सत्तेत येत असून, हिमंता बिस्वा सरमा हे आसाममध्ये हा पराक्रम करणारे पहिले बिगर काँग्रेस मुख्यमंत्री ठरले आहेत.