तामिळनाडूत प्रार्थनास्थळे आणि शाळांजवळील ७१७ मद्यविक्री दुकाने बंद होणार!

मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय

Story: वेब डेस्क| गोवन वार्ता |
just now
तामिळनाडूत प्रार्थनास्थळे आणि शाळांजवळील ७१७ मद्यविक्री दुकाने बंद होणार!

चेन्नई : तामिळनाडूचे नवनियुक्त मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी पदभार स्वीकारताच जनहितार्थ मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील प्रार्थनास्थळे, शैक्षणिक संस्था आणि बसस्थानकांपासून ५०० मीटरच्या परिघात असलेली ७१७ सरकारी मद्यविक्री दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील मद्यविक्रीच्या जाळ्यावर मोठे निर्बंध येणार आहेत.

शासकीय आदेशानुसार, तामिळनाडू स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशनच्या अंतर्गत चालवली जाणारी ही सर्व दुकाने पुढील १५ दिवसांत कायमची बंद केली जातील. यात प्रामुख्याने मंदिर, मशीद आणि चर्च यांसारख्या धार्मिक स्थळांजवळील २७६ दुकाने, शाळा-महाविद्यालयांजवळील १८६ आणि गजबजलेल्या बसस्थानकांजवळील २५५ दुकानांचा समावेश आहे.

राज्यात सध्या एकूण ४,७६५ सरकारी मद्यविक्री केंद्रे कार्यरत आहेत. मात्र, शैक्षणिक आणि धार्मिक परिसराचे पावित्र्य राखण्यासाठी तसेच महिला आणि तरुण पिढीच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री विजय यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत की, चिन्हांकित केलेल्या सर्व ७१७ दुकानांवर दोन आठवड्यांत कारवाई करून त्याचा अहवाल सादर करावा.

अभिनेते ते राजकारणी असा प्रवास करणाऱ्या विजय यांनी आपल्या निवडणूक आश्वासनांची पूर्तता करण्यास सुरुवात केल्याने या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. अमली पदार्थ विरोधी मोहिमेचा एक भाग म्हणूनही या निर्णयाकडे पाहिले जात आहे. या धडाकेबाज निर्णयामुळे प्रशासकीय स्तरावर हालचालींना वेग आला असून, यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा