पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याच्या चर्चांना केंद्र सरकारने पूर्णविराम दिला आहे. भारताकडे कच्च्या तेलाचा पुरेसा साठा असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे स्पष्टीकरण पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने दिले आहे. मात्र, जागतिक अस्थिरतेमुळे इंधनाचा वापर मर्यादित आणि जबाबदारीने करण्याचे आवाहनही सरकारने केले आहे.
पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी आंतर-मंत्रालयीन बैठकीत माहिती दिली की, अमेरिका आणि इराणमधील संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे. असे असले तरी, भारत सरकारने घेतलेल्या प्रभावी निर्णयांमुळे देशातील कच्च्या तेलाची साठवणूक समाधानकारक आहे. आपल्या रिफायनरी पूर्ण क्षमतेने कार्यरत असून कोणत्याही पेट्रोल पंपावर किंवा एलपीजी वितरकाकडे इंधनाचा तुटवडा नाही, असे शर्मा यांनी स्पष्ट केले.
गेल्या तीन दिवसांतील आकडेवारी सादर करताना त्यांनी सांगितले की, १ कोटी १४ लाख बुकिंगच्या तुलनेत १ कोटी २६ लाख एलपीजी सिलिंडरची डिलिव्हरी पूर्ण झाली आहे. कमर्शियल आणि ऑटो एलपीजीचा पुरवठाही मोठ्या प्रमाणात सुरू असून घरगुती गॅसचा पुरवठा विस्कळीत होणार नाही याची काळजी घेतली जात आहे.
सरकारी यंत्रणा परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी शक्य तिथे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा आणि मालवाहतुकीसाठी रेल्वेला प्राधान्य द्यावे, अशी विनंती मंत्रालयाने केली आहे. इंधन बचतीमुळे केवळ आर्थिक बचत होणार नाही, तर जागतिक संकटाच्या काळात देशाला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर राहण्यास मदत होईल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.