
पणजी : गोव्याच्या बेतुल समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे २० नॉटिकल मैल अंतरावर तांत्रिक बिघाडामुळे मासेमारी बोट बुडाल्याची घटना घडली आहे. बोटीवरील कारवार येथील २२ मच्छीमारांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
ही घटना रविवारी सायंकाळी घडली. कारवारच्या मुदगा बंदरातील दिनेश कांचन यांच्या मालकीची ‘श्री अम्मा ३३’ ही पर्ससीन बोट समुद्रात अचानक बुडू लागली. घटनेची माहिती मिळताच मुदगा बंदरातीलच नरेश तांडेल यांच्या ‘जलराज’ बोटीवरील कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्यासाठी धाव घेतली. त्यांनी बुडणाऱ्या बोटीवरील सर्व २२ मच्छीमारांना सुरक्षितपणे दुसऱ्या बोटीत हलवून किनाऱ्यावर आणले, ज्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
सोमवारीही बचावकार्य सुरू असून, स्थानिक सहापेक्षा अधिक मासेमारी बोटी या मोहिमेत सहभागी झाल्या आहेत. समुद्रात बुडालेली बोट आणि मासेमारी जाळी सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेत बोट आणि जाळ्यांचे मोठे नुकसान झाले असून, सुमारे दीड कोटी रुपयांची आर्थिक हानी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.