चिंचणी ग्रामसभेत मागणी : अर्थसंकल्पावरही चर्चा, मंजुरी

मडगाव : गावातील छोटी विकासकामे तातडीने मार्गी लावण्यासाठी सरपंचांना निविदेविना (टेंडरशिवाय) कामे करण्याची मर्यादा ५ हजारांवरून १ लाख रुपयांपर्यंत वाढवून मिळावी, अशी मागणी चिंचणी-देवसू ग्रामसभेत करण्यात आली. यासंदर्भातील ठराव ग्रामसभेने एकमताने मंजूर केला असून तो पंचायत संचालनालयाकडे पाठवण्यात येणार आहे.
चिंचणी-देवसू ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच फ्रँक व्हिएगस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत आर्थिक वर्ष २०२६-२७ साठीचा वार्षिक अर्थसंकल्प बहुमताने मंजूर करण्यात आला. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निधीचे नियोजन कसे असावे, यावर यावेळी सविस्तर चर्चा झाली.
सध्याच्या नियमानुसार सरपंचांना केवळ ५ हजार रुपयांपर्यंतच्या कामांना निविदेविना मंजुरी देण्याचे अधिकार आहेत. मात्र, आजच्या महागाईच्या काळात ही रक्कम अत्यंत कमी असून, साध्या दुरुस्तीच्या कामांसाठीही मोठी तांत्रिक प्रक्रिया पार पाडावी लागते. यामुळे कामांना विलंब होतो. तातडीची कामे आणि नागरी समस्यांचे निवारण जलद गतीने व्हावे, यासाठी ही मर्यादा १ लाख रुपये करावी, असा ठराव ग्रामस्थांनी मांडला. हा अधिकार मिळाल्यास स्थानिक पातळीवर विकासाला मोठी गती येईल, असा विश्वास सरपंच व्हिएगस यांनी व्यक्त केला.
पावसाळापूर्व नियोजनावर चर्चा
ग्रामसभेमध्ये पावसाळ्यापूर्वीच्या मान्सूनपूर्व कामांचाही आढावा घेण्यात आला. गावातील नालेसफाई आणि आपत्ती निवारणाची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी सरकारने 'आपत्ती व्यवस्थापन निधी' वाढवून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. हा निधी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पंचायतीला उपलब्ध करून दिल्यास कामांचे योग्य नियोजन करणे शक्य होईल, असेही यावेळी सांगण्यात आले. या ग्रामसभेला पंचायतीचे सदस्य आणि चिंचणी-देवसू परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.