गुळेली ग्रामपंचायत क्षेत्रात गढूळ पाण्याचा पुरवठा

पाण्याला दुर्गंधी : मुरमुणे, धडा, शेळ, मेळावलीतील लोक संतप्त

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10th May, 11:52 pm
गुळेली ग्रामपंचायत क्षेत्रात गढूळ पाण्याचा पुरवठा

वाळपई : सत्तरी तालुक्यातील गुळेली ग्रामपंचायत क्षेत्रांतर्गत येणाऱ्या मुरमुणे, धडा, शेळ आणि मेळावली या गावांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. पैकुळ प्रकल्पातून येणारे पाणी पूर्णपणे दुर्गंधीयुक्त आणि दूषित असल्याचा आरोप करत स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
रगडा नदीतील पाण्याचा उपसा करून ते पैकुळ प्रकल्पात शुद्ध करून नागरिकांना पुरवले जाते. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून नळातून सफेद रंगाचे आणि गढूळ पाणी येत आहे. हे पाणी पिण्यासाठी तर सोडाच, पण स्वयंपाकासाठी वापरणेही धोकादायक झाले आहे. अन्य पर्यायी सोय नसल्याने नाईलाजास्तव हेच पाणी वापरावे लागत असून, यामुळे आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले. विशेष म्हणजे, दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात हा प्रश्न उद्भवत असल्याचा दावाही नागरिकांनी केला आहे.
पैकुळ प्रकल्पावर कार्यरत असलेले कर्मचारी कामात निष्काळजीपणा करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. नदीतून पाणी प्रकल्पात आणल्यानंतर त्याचे योग्य प्रकारे शुद्धीकरण केले जात नाही. पाणी शुद्धीकरण प्रक्रियेत आवश्यक रसायनांचा वापर होत नसल्यानेच नागरिकांपर्यंत गढूळ पाणी पोहोचत असल्याचा दावा करण्यात येत आहे.
या समस्येबाबत वाळपई येथील पाणीपुरवठा कार्यालयात वारंवार तक्रारी करूनही केवळ आश्वासने दिली जात आहेत. आम्ही तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवल्या आहेत, असे उत्तर देऊन अधिकारी आपली जबाबदारी झटकत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रत्यक्षात जमिनीवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.
रगडा नदीचे पात्रही दूषित
ज्या रगडा नदीतून पाण्याचा उपसा केला जातो, त्या नदीचे पात्रही सध्या पूर्णपणे दूषित झाले आहे. ज्या ठिकाणी पाण्याचे पंप बसवण्यात आले आहेत, त्याच नदीपात्रात पाळीव जनावरे बसत असल्याने पाणी अधिक गढूळ होत आहे. हेच दूषित पाणी पुरेशा प्रक्रियेशिवाय नळाद्वारे पुरवले जात असल्याने प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी मुरमुणे, धडा व मेळावलीतील ग्रामस्थांनी केली आहे.


हेही वाचा