पैसे घेऊन नोकरी दिल्याचे प्रकरण; जे दिसतेय ते केवळ हिमनगाचे टोक : विजय सरदेसाई

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
4 hours ago
पैसे घेऊन नोकरी दिल्याचे प्रकरण; जे दिसतेय ते केवळ हिमनगाचे टोक : विजय सरदेसाई

मडगाव: गोव्यात सरकारी नोकरीसाठी पैसे उकळण्याचे प्रकार सर्रास सुरू असून, सध्या उघडकीस येत असलेली प्रकरणे म्हणजे केवळ हिमनगाचे टोक आहे. या घोटाळ्याची सखोल चौकशी झाल्यास गोव्याचा बेरोजगारीचा दर देशात दुसऱ्या क्रमांकावर का आहे, याचे खरे कारण समोर येईल. मात्र, सत्य बाहेर आले तर भाजपचे पितळ उघडे पडेल, या भीतीने सरकार निष्पक्ष चौकशी करणार नाही, अशी घणाघाती टीका आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे.

गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी राज्यातील गाजत असलेल्या 'पैसे घेऊन नोकरी दिल्याच्या' प्रकरणावरून पुन्हा एकदा सत्ताधारी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, आम्ही सप्टेंबर २०२४ मध्येच या महाघोटाळ्याचा पर्दाफाश केला होता, परंतु त्यावेळी सरकारने हे आरोप फेटाळून लावले होते. सत्ताधारी पक्षाचा नोकऱ्या विकण्याचा हा व्यवसाय आता खोलवर रुजला आहे आणि त्याची व्याप्ती मोठी आहे.

गोव्यातील बेरोजगारीचा दर देशात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचण्यामागे सत्ताधारी पक्षाची चुकीची धोरणे आणि हा नोकरी घोटाळाच कारणीभूत आहे. केवळ वरवरची कारवाई करून गुन्हेगारांना पाठीशी घालण्यापेक्षा, या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन तपासाची व्याप्ती वाढवावी, अशी मागणीही त्यांनी केली. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हावी, जेणेकरून पात्र उमेदवारांना न्याय मिळेल, असेही सरदेसाई यांनी स्पष्ट केले.