करंजाळेत ६०० रुपयांच्या बिलावरून पेट्रोल पंपावर राडा; कर्मचाऱ्यांना मारहाण, ५ जणांना अटक

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
5 hours ago
करंजाळेत ६०० रुपयांच्या बिलावरून पेट्रोल पंपावर राडा; कर्मचाऱ्यांना मारहाण, ५ जणांना अटक

पणजी :  करंजाळे येथे एका पेट्रोल पंपावर इंधन भरल्यानंतर पैशांच्या वादातून कर्मचाऱ्यांना जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना गुरूवारी सकाळी घडली होती.  अवघ्या ६०० रुपयांच्या बिलावरून झालेल्या या वादात पाच संशयितांना पणजी पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, करंजाळे येथील गौरीश धोंड यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर काळ्या कपड्यातील दुचाकीस्वारांचे एक टोळके आले होते. त्यापैकी एकाने गाडीची टाकी पूर्ण भरण्यास  सांगितले. कर्मचाऱ्याने ६०० रुपयांचे पेट्रोल भरले, मात्र ग्राहकाने माझ्या गाडीत इतके पेट्रोल बसणे शक्यच नाही असा दावा करत पैसे देण्यास नकार दिला.

हा वाद इतका विकोपाला गेला की, त्या टोळक्याने पंपावरील अटेंडंटला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. आपल्या कर्मचाऱ्याला वाचवण्यासाठी धावून आलेल्या सुपरवायझरलाही या संशयितांनी ढकलून देत मारहाण केली. या हल्ल्यात दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. पेट्रोल पंप चालक गौरीश धोंड यांनी सांगितले की, आम्ही २४ तास सेवा देतो, पण अशा काही लोकांमुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे.

या घटनेनंतर पणजी पोलिसांनी तत्परता दाखवत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास चक्रावून पाच संशयितांना अटक केली आहे. राज नलकर, आकाश सिंग, क्रिश नावेलकर, मेल्विन ब्रिटो आणि नझीर शेख अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.