उच्च न्यायालयात पोलिसांविरोधात बाजू मांडणार

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : मेरशी येथे माझ्यावर झालेल्या हल्ल्याविषयीची तक्रार नोंद न करता हल्लेखोरांची तक्रार घेऊन चुकीच्या पद्धतीने माझ्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. राजकारणाच्या दडपणामुळे पोलिसांनी माझ्याविरोधात कारस्थान केले आहे, असा दावा सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ शेट्ये यांनी केला.
काशीनाथ शेट्ये यांनी शनिवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन हल्ल्याविषयीची माहिती दिली. या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. पुरावे सादर करून उच्च न्यायालयात मी बाजू मांडणार आहे, असेही शेट्ये यांनी सांगितले. मेरशी येथे खारफुटीची कत्तल सुरू असलेल्या जागेवर पाहणी करण्यासाठी गेलो असताना माझ्यावर हल्ला झाला. हल्ला झाल्यानंतर ११२ डायल करून मी पोलिसांना माहिती दिली. जुने गोवा पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी गेलो तेव्हा त्यांनी मला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. मी तोंडी तक्रार केली; मात्र पोलिसांनी ती नोंदवून घेतली नाही. माझ्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांची मात्र त्यांनी तक्रार नोंदवून माझ्याविरोधात गुन्हा दाखल केला. राजकीय दबावामुळेच पोलिसांनी माझ्याविरोधात गुन्हा नोंद केला आणि माझी तक्रार नोंद करून घेतली नाही. हा सर्व प्रकार मी उच्च न्यायालयासमोर आणणार आहे, असेही काशिनाथ शेट्ये यांनी सांगितले.
दरम्यान, रात्री उशिरा काशिनाथ शेट्ये यांच्या तक्रारीवरून योगेश तिगाडे याच्याविरुद्ध जुने गोवा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
हल्ल्याशी माझा संबंध नाही. माझे नाव घेऊन ज्यांनी माझी बदनामी केली त्यांच्याविरोधात कारवाई होण्यासाठी मी प्रयत्न करेन.
- रूडॉल्फ फर्नांडिस, आमदार, सांताक्रूझ