
पणजी : गोव्यात सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तीन व्यक्तींकडून १८ लाख रुपये उकळल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी सुहाना सुजय नाईक (३९, रा. आमोणा) या महिलेला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित सुहाना नाईकने एका होमियोपॅथिक डॉक्टरला नोकरी देण्याचे आमिष दाखवले होते, तसेच क्लार्क आणि ड्रायव्हरकडूनही या पदांसाठी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यासाठी तिने तीन जणांकडून एकूण १८ लाख रुपये घेतले. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर फोंडा पोलिसांनी तातडीने हालचाली करत सुहानाला ताब्यात घेतले. तिला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी (रिमांड) सुनावली आहे.
या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी संशयित सुहाना नाईकची सर्व बँक खाती गोठवली असून तिच्या घराचीही झडती घेतली आहे. या प्रकरणाच्या मागे आणखी काही लोकांचा हात आहे का आणि इतर कुणाची फसवणूक झाली आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. उपअधीक्षक वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोहन गावडे व त्यांचे पथक या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
बातमी अपडेट होत आहे..